* शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय * निवासी डॉक्टरांचे मानधन थकले *मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी
नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमासाठी पदव्युत्तर विद्यार्थ्यांकडून नोंदणी शुल्क वसुलीसाठी खुद्द प्रशासनच दबाव टाकत असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. दोन महिन्यापासून मानधनापासून वंचित असलेल्या या विद्यार्थ्यांनी फेसबुकच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला ५० वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्त प्रशासनाने माजी विद्यार्थ्यांच्या ‘अॅल्युमिनी असोसिएशन’च्या सहकार्याने २३ आणि २४ जुलै २०१८ रोजी दोन दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याकरिता नोंदणी शुल्कातून सुमारे २५ लाख रुपये गोळा करण्याचे आयोजकांनी निश्चित केले आहे.
त्याअंतर्गत या महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले व विविध संस्था व विभागात मोठय़ा पदांवर सेवा देणाऱ्या डॉक्टरांकडून नोंदणी शुल्क घेतले जात आहे. हा प्रकार योग्य असला तरी प्रशासनाकडून पदव्युत्तरच्या सुमारे ४७ विद्यार्थ्यांवर प्रत्येकी ५ हजार ५०० रुपये देण्यासाठी दबाव टाकला जात आहे. त्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून संदेश पाठवले जात आहेत.
दरम्यान, पदव्युत्तर डॉक्टरांना दोन महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. त्यांना दैनंदिन खर्च कसा भागवायचा असा प्रश्न पडला आहे. यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फेसबुकच्या माध्यमातून तक्रार केली आहे.
चार महिन्यांपासून क्ष-किरण यंत्र बंद
शासकीय दंत महाविद्यालयात प्रथम तांत्रिक कारणाने क्ष-किरण यंत्र बंद होते. ते दुरुस्त झाल्यानंतर फिल्मच्या तुटवडय़ामुळे पुन्हा काम बंद पडले. यंत्र कायम सुरू राहावे म्हणून प्रशासनाकडून प्रयत्न केले जात नाहीत.
पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवासाठी शुल्क देणे ऐच्छिक आहे. कुणावरही सक्ती केली जात नाही. महाविद्यालयातील बंद असलेले क्ष-किरण यंत्र आता सुरू झाले आहे. शासनाने पदव्युत्तर डॉक्टरांचे मानधन डिसेंबपर्यंत देता येत नसल्याचे सांगितल्याने प्रशासनाने पीएलए खात्यातून ही रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे येत्या १५ ते २० दिवसांत सर्व विद्यार्थ्यांना मानधन मिळेल.
– डॉ. सिंधू गणवीर, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.