अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनावर हल्ला प्रकरणात सहभागी मनसैनिकाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री अकोल्यात घडली. जय मालोकार (२४) असे मृतक मनसैनिकाचे नाव आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दोषींवर कारवाई करण्याची मागणी संतप्त नातेवाईकांनी केली. वाहन तोडफोडीदरम्यान झटापटीमध्ये जय मालोकारला जबर धक्का बसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.  

हेही वाचा >>> अमरावती : एकतर्फी प्रेमातून केले युवतीवर चाकूने वार, नागरिकांनी आरोपीला चोपले

अजित पवार पुण्यात नसतानाही येथील धरणे भरल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्या टीकेला आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले. राज ठाकरे ‘सुपारीबहाद्दर’ असल्याची टीका त्यांनी केली होती. टोल आणि भोंग्याचे आंदोलन फसलेल्या ‘सुपारीबहाद्दरां’नी अजित पवारांवर बोलू नये. कुठल्याही आंदोलनाला ते यशस्वी करू शकले नाहीत. राज ठाकरेंची विश्वासार्हता संपली आहे, असा टोला आमदार मिटकरी यांनी लगावला होता. या टीकेमुळे मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले. यातून अमोल मिटकरी यांच्या वाहनाची मंगळवारी अकोल्यात तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर आमदार अमोल मिटकरी यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली.

हेही वाचा >>> नग्नावस्थेत रस्त्यावर फिरणाऱ्या तरुण-तरुणीच्या प्रकरणात नवा ‘ट्विस्ट’; व्हिडिओ काढणाऱ्याविरोधात गुन्हा

या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी मनसेच्या १३ पदाधिकारी व मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला. दरम्यान, आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनावर हल्ला प्रकरणात मनसैनिक जय मालोकार यांचा सहभाग होता. आंदोलन प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने मनसैनिक जय मालोकार प्रचंड तणावात आले. या दबावातूनच त्यांना मंगळवारी रात्री हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपचारासाठी त्यांना तत्काळ शहरातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान मनसैनिक जय मालोकार यांचा मृत्यू झाला. जय मालोकार यांचे होमिओपॅथीच्या तृतीय वर्षाचे शिक्षण सुरू होते. ते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ते जिल्हा उपाध्यक्ष होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनसेचे आंदोलन व त्यानंतर पोलीस कारवाईचा दबाव आल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा आरोप झाला. जय मालोकार यांच्या निधनामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला. जय मालोकार यांच्या नातेवाईकांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना आज संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. जय मालोकार याला लोटालाटी झाली. त्याचा दबाव त्याच्यावर आला. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासावे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दोषींवर कारवाई करण्यात यावी. या प्रकरणात पोलीस तक्रार करणार आहोत, असे नातेवाईक डॉ. किशोर मालोकार यांनी सांगितले.