अमरावती : ‘डिजिटल अरेस्ट’ हा सध्या भारतातील सर्वात मोठा सायबर धोका ठरला आहे. यात गुन्हेगार आपल्याला पोलीस, सीबीआय, ईडी, कस्टम किंवा इन्कम टॅक्स वा अमलीपदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी असल्याची बतावणी करीत पीडित व्यक्तीला फोन करतात. नंतर त्यांच्यावर किंवा त्यांच्या कुटुंबीयांवर अनैतिक कामात सहभागी असल्याचा आरोप करतात. त्यानंतर फसवणूक करणारे व्हिडीओ कॉल करण्याची मागणी करतात. साधा कॉल अथवा व्हिडीओ कॉल करून अटक करण्याची भीती दाखवतात. नंतर पीडित व्यक्तीला खोटी कागदपत्रे दाखवून किंवा खोटे ओळखपत्र दाखवून घाबरवले जाते. त्यांना अटकेची कारवाई टाळण्यासाठी दंड भरण्यासाठी दबाव टाकला जातो.

अमरावतीत ‘डिजिटल अरेस्ट’चा आणखी एक प्रकार समोर आला आहे. फिर्यादी हे ७९ वर्षीय सेवानिवृत्त बँक अधिकारी आहेत. गेल्या २० मार्च रोजी त्यांना सायबर भामट्याने फोन केला. त्याने मुंबई क्राईम ब्रँचच्या सीबीआय विंगचा अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादी यांच्यावर मनी लाँड्रींगमध्ये गुन्हे दाखल असल्याची थाप मारली. या प्रकरणात त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात आल्याचे भासवले. त्यांच्या पत्नी व मुलाला जिवे मारण्याची धमकी देऊन ३१.५० लाख रुपये लुबाडण्यात आले. २० ते २९ मार्च या कालावधीत ही आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी त्या वृद्धाच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी अज्ञात भामट्यांविरुद्ध फसवणूक व आयटी अॅक्टअन्वये गुन्हा दाखल केला.

मुंबई सीबीआय क्राईम ब्रँचमधून बोलत असल्याची थाप या भामट्याने मारली. दबावासाठी गोयल नामक व्यक्तीचा व एका एअरवेजचा उल्लेख करून तो व्यक्ती ५३८ कोटींच्या मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यात अडकला असून, त्याचा तपास सीबीआयमार्फत सुरू आहे. त्यात आपले नाव आल्याचे त्याने फिर्यादीला सांगितले. त्यातून सुरक्षित बाहेर पडायचे असेल तर सर्वोच्च न्यायालयात हजर राहून मार्ग काढू शकतो, असे सांगण्यात आले. फोन बंद करू नका, कुणाकडेही वाच्यता करू नका, कुणासोबतही बोलू नका, हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याचे सांगत त्यांना अटकेची भीती दाखविली.

सायबर भामट्यांनी त्यांना व्हिडीओ कॉल केला. फिर्यादीला न्यायालय परिसर व एक खोली दाखविण्यात आली. अटक टाळायची असेल, तर दोन कोटी रुपये लागतील, अशी मागणी करण्यात आली. फिर्यादीने एकूण ३१.५० लाख रुपये त्यांनी दिलेल्या बँकखात्यावर जमा केले. नंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.