वाशीम : सध्या उन्हाळा सुरू आहे की पावसाळा, असा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाने जिल्ह्यात मुक्काम ठोकला आहे. २ एप्रिल रोजी रात्री जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या ओसंडून वाहत आहेत.

गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. कधी मुसळधार, कधी गारपीट, कधी रिमझिम तर कधी विजेच्या कडकडटासह पावसाचा कहर सुरू आहे. मंगळवारी रात्री वाशीम, मानोरा, मालेगावसह बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस झाला. संततधार पावसामुळे रुई गोस्ता येथील पूस नदीला पूर आला, तर अनेक भागातील छोट्यामोठ्या ओढ्या, नदी नाले ओसंडून वाहत आहेत. वाशीम तालुक्यातील अनसिंग ग्रामीण रुग्णालय जलमय झाले होते.

Rivers flooded washim
अनसिंग ग्रामीण रुग्णालय परिसरात साचलेले पाणी
व्हिडीओ – लोकसत्ता टीम

हेही वाचा – उन्हाळ्यात कोरडी राहणारी पूर्णा नदी मुसळधारेमुळे तुडुंब! ग्रामस्थ सुखावले

सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील उन्हाळी पिके, लिंबू, आंबा, टमाटे आदी पिकांचे नुकसान होत आहे. प्रशासनाकडून पीक नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. परंतु मदत कधी मिळेल, असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे. आज बुधवारीदेखील बहुतांश ठिकाणी ढग दाटून आलेले असून वातावरणात गारवा पसरला आहे.