नागपूर : चहा बनवण्याची अनोखी शैली, लक्षवेधी वेशभूषा, कपात चहा ओतणण्याचा रजनिकांत स्टाईल अंदाजामुळे समाज माध्यमांवर लोकप्रिय डॉली चायवाला हे नागपूरमधील सिव्हिल लाईन्समध्ये अनेकांचा अड्डा झाला आहे. आठ जणांना कोट्यवधींचा गंडा घालणारी लुटेरी दुल्हन समीरा फातिमाला डॉलीच्या याच लोकप्रियतेचा मोह अनावर झाला अन् गाफील क्षणी गिट्टीखदान पोलीसांनी तिच्या हातात चहासोबत आता बेड्या ठोकल्या. आठ जणांना फसवल्यानंतरही समाधान न झाल्याने ही लुटेरी दुल्हन नवव्या पती सोबत चहाचे झुरके मारत होती.
लुटेरी दुल्हन या नावाने कुप्रसिद्ध समीराने २०१० पासून आतापर्यंत ८ जणांसोबत निकाह करीत त्यांना लाखोंचा गंडा घातला आहे. नवव्या पतीसोबत ती अखेर डॉलीच्या टपरीवर हाती लागल्याची माहिती मिळताच फसवणूकीला बळी पडलेल्या आठ पतींनी गुट्टीखदान पोलिसांचे आभार मानले. अनेक महिन्यांपासून ही लुटेरी दुल्हन तपास यंत्रणांना गुंगारा देत होती.
आठ जणांना कोट्यवधींचा गंडा घालणारी ही लुटेरी दुल्हन डॉलीच्या टपरीवर आल्याचा सुगावा गिट्टीखदान पोलीस उपनिरीक्षक शारदा भोपळे त्यांना लागला होता. भोपाळे या पथकासह तेथे पोचल्या. त्यावेळी ही लुटेरी दुल्हन सिव्हिल लाईन्स मधील डॉलीच्या टपरीवर दुपारी २:३० वाजता नवव्या पतीसोबच चहाचे झुरके मारून बाहेर पडत होती. पथकाने लगेच तिच्या हाता बेड्या ठोकल्या.
मुकाम -ए – सरकारी सासुरवाडी!
विशेष म्हणजे भोपळे यांची टीम गेल्या दीड वर्षांपासून तिच्या मागावर होती. लुटेरी दुल्हन नावाने कुप्रसुद्ध फातीमाने आतापर्यंत इम्रान अंसारी, नजमुम साकीब, रहेमान शेख, मिर्झा अशरफ बेग, मुदस्सीर मोमिन, मोहम्मद तारिक अनिस, अमानुल्लाह खान, गुलाम गौस पठाण आणि आणखी एक अशा आठ जणांशी निकाल करीत त्यांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. तिला ताब्यात घेतल्यानंतर गिट्टीखदान पोलिसांनी न्यायालयासमक्ष उभे केले. न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. त्यामुळे फातिमाला आता सरकारी सासुरवाडीचा पाहुणचार मिळणार आहे.
डॉलीचा मोह अंगलट
रंगीबेरंगी केस, स्टायलिश कपडे, मोठे गॉगल्स आणि रजनीकांतच्या अंदाजात चहा ओतणे ही डॉली चहा वाल्याची ओळख आहे. ‘डॉली की टपरी’ या नावाने प्रचलित त्याच्या चहाच्या गाड्यावर रोज शेकडो ग्राहक येतात. युट्युबवर त्यांचा चॅनेल असून त्याला १३ लाखांहून अधिक सदस्य आहेत. इंस्टाग्रामवरही त्यांचे लाखो फॉलोअर्स आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली, जेव्हा मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स त्यांच्या टपरीवर चहा प्यायला आले. गेट्स यांनी स्वतः हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यानंतर डॉली चायवाला रातोरात चर्चेत आले. ते दररोज सुमारे ५०० ते ६०० कप चहा विकतात आणि महिन्याला अंदाजे दीड लाख रुपयांपर्यंत कमाई करतात. सोशल मीडियावर मिळालेल्या प्रसिद्धीमुळे त्यांना विविध ब्रँड्ससोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. डॉलीचा हाच मोह लुटेरी दुल्हन फातीमाच्या अंगलट आल्याची आता चर्चा आहे.