बुलढाणा : खामगाव येथून मुंबईकडे जाण्यासाठी मेहकर येथून समृद्धी महामार्गाने (एमएच.४३.बियू.९५५७ क्रमांकाच्या ) कीया गाडीने जाणाऱ्या व्यापाऱ्यास समृद्धी टोलनाका पास केल्यानंतर मुंबईकडे जाणाऱ्या वळणावर चारचाकीने आलेल्या चार ते पाच दरोडेखोरांनी लुटल्याची घटना घडली.

यामध्ये व्यापाऱ्याजवळील तब्बल पावणे पाच किलो सोने व मुद्देमाल लंपास झाल्याचा अंदाज आहे. यावर कळस म्हणजे लूटमार झालेल्या व्यापाऱ्याचा चालक दरोडेखोरांना सहभागी झाल्याचे निष्पन्न झाले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथून मुंबईकडे जाण्यासाठी अनिल शेशमल जैन चौधरी (राहणार मुंबई) हे व्यापारी त्यांच्या किया कारने मुंबईकडे जात होते.

फरदापुर गावाजवळील टोल नाक्यावरून गाडी चौधरी हे स्वतः चालवत असताना चालकाने स्वतःचे पोट दुखत असल्याचा बहाणा केला. तसेच गाडी रस्त्याच्या कडेला उभे करा असे, व्यापाऱ्याला सांगितले. त्यांनी गाडी मुंबईकडे जाणाऱ्या वळणावर उभी केली.

एवढ्यात अचानक पाठीमागून आलेल्या इनोव्हामधील चार ते पाच अज्ञात दरोडेखोरांनी व्याापाऱ्याच्या हातावर चाकू मारुन आणि मिरचीची पूड डोळ्यांमध्ये फेकली. याच दरम्यान गाडीतील बॅग (ज्यामध्ये जवळपास पावणे पाच किलो सोने होते) घेऊन दरोडेखोरांच्या गाडीमध्ये बसला. यानंतर गाडी मालेगावच्या दिशेने भरधाव वेगाने पळविण्यात आली. संबंधित घटनेची माहिती मेहकर पोलीस स्टेशनला कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

तोपर्यंत दरडोखोरांची गाडी मालेगाव येथील टोलनाका पास करून पातुरच्या दिशेने गेली होती. त्या ठिकाणी देखील पातुर पोलीस व अकोला येथील पोलिसांनी नाकाबंदी केली. मात्र, गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करून पातुरच्या जंगलामध्ये दरोडेखोर पसार झाले. घटनेचा पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहे. या घटनेमुळे हिंदुहृदाय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी दृतगती महामार्गाने प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यात दहशत निर्माण झाली आहे.

व्यापाऱ्यात दहशत

जलदगती प्रवासासाठी करोडो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या समृद्धी मार्गावरील सुरक्षितता यामुळे चव्हाट्यावर आली असून प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. तसेच समृद्धी महामार्ग गुन्हेगारांसाठी ‘समृद्ध’ ठरत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी महामार्गावर उभ्या वा मुक्कामी असलेल्या वाहनातील इंधन चोरी करणाऱ्या टोळ्या कार्यरत असल्याचे आढळून आले. या महामार्गावर इंधन चोरीच्या अनेक घटना घडल्या आहे. नुकताच ‘समृद्धी’वर तब्बल ६६ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता.