scorecardresearch

नागपूर: यंत्रमानव शस्त्रक्रिया केंद्राचा मार्ग मोकळा; राज्यातील पहिलाच प्रयोग नागपुरात

राज्यातील पहिल्या यंत्रमानव शस्त्रक्रिया (रोबोटिक सर्जरी) केंद्राचा प्रस्ताव विविध कारणांनी गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता. मात्र, आता खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

robotic surgery
‘यंत्रमानव शस्त्रक्रिया केंद्र’(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

राज्यातील पहिल्या यंत्रमानव शस्त्रक्रिया (रोबोटिक सर्जरी) केंद्राचा प्रस्ताव विविध कारणांनी गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता. मात्र, आता खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे लवकरच अमेरिकेतून हे यंत्र नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) पोहोचणार आहे.

सुमारे साडेतीन मेडिकलमध्ये ‘यंत्रमानव शस्त्रक्रिया केंद्र’ स्थापण्याचा निर्णय झाला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी पुढाकार घेतला होता. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खनिकर्म निधीतून १६.८० कोटी रुपये देण्यात आले. यंत्र खरेदीसाठी ‘हाफकीन’कडे तेव्हाच रक्कम वर्ग झाली. मात्र, विविध कारणाने विलंब होत गेला.

हेही वाचा >>>यवतमाळच्या ‘आरटीओ’ अधिकाऱ्यालाही अडीच कोटी मागितले? दोन्ही लाचखोरांच्या संभाषणाचा तपशील समोर

प्रथम निविदेत दोनच कंत्राटदार सहभागी झाल्याने प्रक्रिया रद्द झाली. या केंद्राला विलंब होत असल्याने उच्च न्यायालयाने जनहित याचिकेच्या सुनावणीत तातडीने निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले. त्यानुसार ‘हाफकीन’ने निविदा प्रक्रियाही राबवली. त्यात तीनपैकी एका कंत्राटदाराने २०.५० कोटीत हे यंत्र पुरवण्याची तयारी दर्शवली. दरम्यान, अतिरिक्त ३.८९ कोटी मिळणार कुठून हा प्रश्न निर्माण झाला. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयाने खनिकर्म महामंडळाकडून हा निधी मिळवून दिला. हा निधी ‘हाफकीन’कडे वर्ग झाल्यावरही खरेदीचा पेच कायम होता. शेवटी वैद्यकीय शिक्षण खात्याने पाठपुरावा केल्याने खरेदीचा आदेश निघाला. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत हे यंत्र मेडिकलला पोहचण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प २१ कोटींचा आहे, हे विशेष.

खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे अमेरिकेहून सुमारे १२ आठवड्यात हे यंत्र मेडिकलमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेसाठी शासनाकडून पूर्ण मदत मिळाली.- डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता, मेडिकल, नागपूर.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 10:21 IST

संबंधित बातम्या