लोकसत्ता टीम

नागपूर : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील बोदवडजववळ अमरावती एक्सप्रेसला धडकला एक ट्रक धडकल्याने मुंबई ते हावडा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबई, कोल्हापूर, पुण्याहून नागपूरकडे येणाऱ्या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

गव्हाने भरलेला तामिळनाडूचा ट्रक मुक्ताईनगरवरून बोदवडकडे जात असताना रेल्वे गेट तोडून थेट अमरावती एक्सप्रेसला धडकला. या भीषण अपघातामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे काही गाड्यांचा मार्गात बदल करण्यात आला आहे तर दोन पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या. सुदैवाने, कोणतीही जिवितहानी झाली नाही. ट्रकला इंजिनखाली अडकलेल्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी जेसीबी आणि क्रेन तात्काळ मागवण्यात आल्या.

शुक्रवारी पहाटे ४:४५ वाजता हा अपघात घडला. ट्रक चालकाने रेल्वे ओव्हरब्रिजचा वापर न करता बंद असलेला रेल्वे गेट तोडून ट्रॅकवर प्रवेश केला. त्याच वेळी वेगाने येणाऱ्या अमरावती एक्सप्रेसने ट्रकला जोरदार धडक दिली. धडकनंतर रेल्वेने ट्रकला सुमारे २०० ते ३०० मीटरपर्यंत फरफटत नेले. यामुळे रेल्वे इंजिनचे मोठे नुकसान झाले असून, संपूर्ण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

एलटीटी-शालिमार एक्सप्रेस, पुणे-नागपूर एक्स्प्रेस, कोल्हापूर- गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस, सीएसएमटी-हावडा दुरंतो एक्सप्रेस, अहमदाबाद-चेन्नई नवजीवन एक्सप्रेस यांच्या मार्गात बदल करण्यात आला. या गाड्या खंडवा-इटारसी आणि नागपूर मार्गे धावणार आहेत. तसेच भुसावळ-बडनेरा आणि बडनेरा-नारखेडा पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अपघातग्रस्त इंजिन दुरुस्तीसाठी पियूषनगर येथे पाठवले गेले, आणि अमरावती एक्सप्रेसला नवीन इंजिन जोडून मार्गस्थ करण्यात आले. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही, हे सुदैवाने सांगता येईल. तथापि, या घटनेने रेल्वे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. प्रवाशांकडून संबंधित ट्रक चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.