Mohan Bhagwat Dussehra Speech in Nagpur नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमीचा उत्सव गुरुवारी नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी स्वयंसेवकांना संबोधित करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू धर्म, भारत, आपल्या देशाची आंतरराष्ट्रीय धोरण, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आयात कर, नेपाळ व बांगलादेशमधील सध्याची स्थिती, सोनम वांगचुक यांना झालेली अटक, पहलगाममधील दहशतवादी हल्ला यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

यावेळी कायदा हातात घेणाऱ्यांना शिक्षा करण्यावरून सरकार आणि प्रशासनाचे कान टोचले. अलिकडच्या काळात, आपल्या शेजारील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात अशांतता आहे. श्रीलंका, बांगलादेश पाठोपाठ नेपाळमध्ये सत्तांतरास कारणीभूत ठरलेल्या जनतेचा हिंसक उद्रेक चिंताजनक आहे. अशा अशांतता निर्माण करू पाहणाऱ्या शक्ती भारतात तसेच जागतिक स्तरावर सक्रिय आहेत.

हिंसक उद्रेकांमध्ये इच्छित बदल घडवून आणण्याची शक्ती नसते. केवळ लोकशाही मार्गांनीच समाज आमूलाग्र बदल साध्य करू शकतो. याउलट, हिंसक घटनांमुळे जागतिक वर्चस्ववादी शक्तींना गैरफायदा घेण्याची संधी मिळण्याची शक्यता असते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

काय म्हणाले भागवत?

आपला देश विविधतेने नटलेला आहे. गेल्या हजारों वर्षांपासून काही विदेशी संप्रदाय भारताबाहेरील देशांमधून आले. परदेशी लोक आता निघून गेले असले तरी, आपल्या देशातील काही बांधवांनी त्यांच्या धर्मा आणि पंथाचा स्वीकार केला. तरीही ते आज भारतात गुणा गोविंदाने नांदत आहेत. आपल्या देशात विविधता असूनही, आपण सर्व एका मोठ्या समाजाचा भाग आहोत. प्रत्येकाचे स्वतःचे श्रद्धास्थाने, महापुरुष आणि प्रार्थनास्थळे असतात. विचार, शब्द आणि कृतीतून त्यांचा अनादर होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. त्याकरिता प्रबोधनाची गरज आहे.

नियमांचे पालन करणे, सुसंवादाने वागणे हा आपला स्वभाव बनला पाहिजे. लहान-मोठ्या बाबींवरून किंवा केवळ संशयावरून कायदा हातात घेणे, गुंडगिरी, हिंसाचार करणे ही चांगली पद्धत नाही. अशा घटना पूर्वकल्पित कल्पनेने किंवा एखाद्या विशिष्ट समुदायाला चिथावणी देण्यासाठी शक्ती प्रदर्शित करण्यासाठी घडवल्या जातात. त्यांच्या जाळ्यात अडकले जाणे तात्काळ आणि दीर्घकालीन ध्येयासाठी हानिकारक आहे. अश्या समज विघातक प्रवृत्तींना आळा घालणे आवश्यक आहे. सरकार आणि प्रशासनाने पक्षपात न करता, दबावाला बळी न पडता नियमांनुसार आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. समाजातील सज्जनशक्ती आणि तरुण पिढीने देखील सतर्क, संघटित राहून आवश्यकतेनुसार हस्तक्षेप केला पाहिजे, असे आवाहन भागवत यांनी केले.