RSS in the Indian freedom struggle नागपूर: भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख नसणे यामध्ये आश्चर्य असे काहीच नाही. कारण यासंदर्भातील आरोप अनेकदा झाला आहे. तर रा. स्व. संघाने ब्रिटिशांना मदत केली, असा आरोपही होतो. मात्र, १९२५ साली स्थापना झाल्यापासूनच शंभर वर्षात संघाचा विस्तार सर्वदूर झाला आहे. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवक (सदस्य) म्हणून हिंदूराष्ट्रास स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध राहीन,’ असे संघाच्या शपथेमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. मात्र, संघाचा रतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभाग होता, असा दावा संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून अनेकदा केला जातो. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये संघ परिवारातील विद्यापीठ शिक्षण मंचाच्या वतीने गुरूपौर्णिमा उत्सव कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह अतुल मोघे उपस्थित होते. त्यांनी स्वातंत्र्यलढा आणि अखंड भारताविषयी काय दावा केला पाहूया…
काँग्रेसच्या लाहोर येथे झालेल्या १९३० च्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा ठराव मान्य करण्यात आला होता. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार १९२० मध्ये नागपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात सर्वातआधी संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला होता, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह अतुल मोघे यांनी केला.मोघे म्हणाले, काँग्रेसच्या १९३०च्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मान्य झाला ती तारीख २६ जानेवारी होती. याची आठवण राहावी म्हणूनच त्याच दिवशी भारताने संविधानाचा स्वीकार केला. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला बोलताना मागील ७८ वर्षांच्या प्रवासाची आवठण करणे आवश्यक आहे.
१९२० मध्ये डॉ. हेडगेवार हे काँग्रेसचे सदस्य होते. १९२० च्या अधिवेशनात ते सक्रिय कार्यकर्ते होते. यावेळी त्यांनी दोन प्रस्ताव मांडले होते. यात पहिला प्रस्ताव हा संपूर्ण स्वातंत्र्याचा होता. तर दुसरा प्रस्ताव हा जगाला भांडवलशाही क्षेत्राच्या बाहेर काढण्यासाठी भारताची भूमिका महत्त्वाची राहणार असून आपण त्याचे नेतृत्व करावे, असा होता. डॉ. हेडगेवारांनी १९२० मध्ये मांडलेला प्रस्ताव काँग्रेसने १९३०च्या अधिवेशनात मान्य केला, असेही मोघे म्हणाले. येणाऱ्या काळात भारताला जगाचे नेतृत्व करावे लागणार असून अखंड भारत होणार असल्याचे सुतोवाचही अतुल मोघे यांनी केले. यासाठी प्राध्यापकांची भूमिका महत्त्वाची आहे. प्राध्यापकाने शिकवत असताना जागतिक दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवायला हवा. आज जगामध्ये व्यापारावरून वाद आहे. भारतावर आपले वर्चस्व थोपवण्याचा प्रयत्न काही देश करत आहेत. मात्र, यासाठी अमेरिका आणि रशियाला दोष देण्यात काहीही अर्थ नाही. त्यांचे राजकारण ते करतात. कुणाचा वचपा काढायचा किंवा एखाद्या देशाविषयी मुद्दाम काही कुरापती करणे ही भारतीय संस्कृती नाही. खरी संस्कृती जपणारा देश म्हणजे भारत ही आपली ओळख आहे. आपण हा सांस्कृतिक ठेवा जपला आहे. वसुधैव कुटुंबकम् हे म्हणणारा जगात फक्त भारत देश आहे, असेही ते म्हणाले.