नागपूर : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षा, स्कूलबस, स्कूलव्हॅन, ई-रिक्षामध्ये आसनक्षमतेच्या तुलनेत दुप्पटहून जास्त विद्यार्थ्यांची अक्षरश: कोंबून वाहतूक होत असल्याचे ‘लोकसत्ता’ने पुढे आणले होते. त्याची दखल घेत आरटीओ कार्यालयाने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्वच वाहनांची झडती सुरू केली आहे. नियमांची पायामल्ली करणाऱ्या १९५ वाहनांवर कारवाई केली गेली. या कारवाईबाबतचे व्हिडिओ आता समाज माध्यमांवर प्रसारीत होत आहे.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर असलेल्या नागपुरातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूकीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हा मुद्दा मध्य नागपुरातील भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी उपस्थित केला होता. त्यानंतरही ही वाहतूक सुरू आहे. दरम्यान या घटनेबाबत आपण जाणून घेऊ या. नागपुरात शाळा सुरू झाल्यावरही बऱ्याच वाहनांची अद्याप योग्यता तपासणी केली नाही. हा गंभीर प्रकार असतानाही त्याकडे आरटीओसह वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होते.
दरम्यान नागपुरातील तीन आसन क्षमतेच्या ऑटोरिक्षात १० ते १३ विद्यार्थ्यांची कोंबून वाहतूक होत असल्याचे लोकसत्ताने पुढे आणले होते. या वृत्तानंतर हा मुद्दा विधान सभेतही गाजला. त्यानंतर जुलै २०२५ पासून आरटीओ अधिकाऱ्यांची पथके तैनात करून शहरातील विविध भागात अचानक स्कूलबस, स्कूलव्हॅन, ऑटोरिक्षा, ई-रिक्षाची तपासणी मोहीम राबवली गेली. त्यात नियम धाब्यावर बसवणाऱ्या १९५ वाहनांकडून कारवाई करत ९ लाख ७८ हजार रुपयांचा दंड वसूल केला गेला. ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
नागपुरात खासगी वाहनातूनही विद्यार्थ्यांची नियमबाह्य वाहतूक
नागपुरात मोठ्या प्रमाणावर शिकवनी वर्ग सुरू आहे. शिकवणीच्या बदल्यात विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये शुल्क आकारले जाते. त्यातच या शिकवणी वर्गासह शाळांमध्येही मोठ्या संख्येने खासगी वाहनातूनही शिकवणीसह शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक होत आहे. त्यामुळे ७ जुलैपासून खासगी वाहनांचीही तपासणी केली जात आहे. त्याअंतर्गत खासगी वाहनात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ३८ वाहनांवर कारवाई करण्यात आली.
कारवाईची स्थिती
वाहनांचा प्रकार | ई-चालान | दंड वसुली |
स्कूलबस, स्कूल व्हॅन | ६० | ५,५०,००० |
खासगी वाहन | ३८ | ३,४०,००० |
ऑटोरिक्षा | ८२ | ८६,००० |
ई-रिक्षा | १५ | २,००० |
एकूण | १९५ | ९,७८,००० |