करोना प्रतिबंधक लसीची एकच मात्रा घेणाऱ्यांना प्रवेश नाही

नागपूर : करोनाचा प्रभाव कमी झाल्याने महाविद्यालये सुरू झाली असून विद्यापीठांनी आता परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, करोनाच्या दोन्ही लसींच्या मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेशाची अट कायम असल्याने ज्या विद्यार्थ्यांनी लसीची एकच मात्रा घेतली असेल त्यांच्या परीक्षेचे काय?, त्यांना ऑफलाईन परीक्षा देता येईल का? असा संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे महाविद्यालये आणि विद्यापीठेही परीक्षेच्या नियोजनात आडकाठी निर्माण होत आहे.

विदर्भात प्रामुख्याने नागपूर विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठ आहे. सध्या सर्वच जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रभाव कमी झाला आहे. यामुळे शाळा, महाविद्यालये उघडण्यात आल्याने विद्यापीठ आता परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याच्या विचारात आहे. यासंदर्भात शासनाकडून परवानगी मिळताच विद्यापीठ तशा सूचना विद्यार्थी आणि महाविद्यालयांना देणार आहे. शिवाय नवीन परीक्षा पद्धतीमधील बदलामुळे ऑफलाईन परीक्षा या महाविद्यालय स्तरावर होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. करोनामुळे मागील दीड वर्षापासून सर्व परीक्षा या ऑनलाईन घेण्यात आल्या. या परीक्षांचा अनुभव सर्वांसाठीच नवीन असल्याने विद्यापीठाला परीक्षेतील अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले.

आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. महाविद्यालयांची सुरुवातही झाली आहे. त्यामुळे आता विद्यापीठाद्वारे हिवाळी परीक्षा ऑफलाईन घेण्याचा विचार करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक ती तयारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाद्वारे पूर्ण करण्यात आली आहे. साधारणत: नोव्हेंबरच्या शेवटच्या किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हिवाळी परीक्षा घेण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. मात्र, या परीक्षा ऑफलाईन घेताना आता करोना नियमांच्या अडचणी येणार आहेत. शासनाने महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष वर्गांसाठी करोना लसीच्या दोन्ही मात्रा घेणे अनिवार्य केले आहे. एक मात्रा घेणाऱ्यांना प्रवेश नाकारला जातो. त्यामुळे परीक्षा जर ऑफलाईन झाली तर लसीची एक मात्रा घेणाऱ्यांनी परीक्षा कशी द्यायची असा सवाल उपस्थित केला जात आहे.

प्राचार्य फोरमचा आक्षेप

प्राचार्य फोरममध्ये ऑफलाईन परीक्षेवर आक्षेप घेतला आहे. परीक्षा ही ऑफलाईन करताना कशी घेतली जाईल, असा आक्षेप घेतला आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी अद्यापही करोनाची एकही मात्रा घेतलेली नाही. तर काहींनी फक्त एकच मात्रा घेतली आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश नाही तर ते परीक्षा कशी देणार? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.