नागपूर : शूज स्टँडमधील चप्पल घालायला जात असाल तर सावधान! आता घाईघाईने न बघताच चप्पल घालून बाहेर जाणे परवडणारे नाही. कारण तुमच्या शूज स्टँडमध्ये आता साप असू शकतो. पावसाळ्यात तर हा प्रकार मोठ्या प्रमाणात घडून येऊ शकतो. त्यामुळे घाईगडबड परवडणारी नाही, तर शूज स्टँडमधील चप्पल देखील आता विचारपूर्वक घालावी लागणार आहे. नागपुरातील एका सोसायटीत घडून आलेल्या प्रकारानंतर साऱ्यांनाच धडकी भरली आहे.

साप कधी कुठे ठाण मांडून बसेल याचा काही नेम नाही सध्या झुडपी क्षेत्रालगतच्या वस्तीत, मोकाट प्लॉट असलेल्या भागात तसेच दिवसेंदिवस वाढत्या सिमेंटीकरण होत असलेल्या क्षेत्रात साप निघन्याचे प्रमाण अधिक आहे. साप शिकार मिळवण्यासाठी देखील बरेचदा लोकांच्या घरात कंपाउंड मध्ये शिरल्याचे बघायला मिळत आहे.

चिचभवन रोड येथील जयंती नगरी- तीन मधील रहिवासी नवनीत अमराते घराबाहेर पड़तांना शूज स्टँड जवळ गेले असता शूज स्टँड मधील एका चप्पलच्या आत त्यांना साप बसून दिसला, कॉलनीतील सर्वांसाठी ही आश्चर्याची बाब होती, सुदैवाने अनर्थ टळला.

ही माहिती “हेल्प फॉर ॲनिमल वेलफेअर असोसिएशन नागपूर” चे सर्पमित्र आशिष राहेकवाड, सचिन झोडे यांना मिळताच घटनास्थळ गाठून सुरक्षितरित्या दीड फूट लांबीचा जहाल विषारी “रसल वाइपर साप” रेस्क्यू करुन लोकांच्या मनातील प्रश्नाचे निराकरण करुन सापाला निसर्ग मुक्त केले.

घोणस (Russel viper) हया सापाला वन्यजीव संरक्षण अधिनियम संशोधित कायद्यानुसार अधिसूची एक अंतर्गत विशेष संरक्षण प्राप्त आहे. हा साप दिसायला अजगर सारखा असतों. डोक त्रिकोणी, पिवळसर रंग, त्यावर रुद्राक्षासारख्या ठिपक्याची माळ असते, हा साप चिड़ला असता किंवा कोणी संपर्कात आले असता कुकरच्या शिटी प्रमाणे सतत आवाज करतो. हा साप “वाइपरडी” कुळातील असुन हिमोटॉक्सिक विषयुक्त असतो, भारतात सर्वात जास्त सर्पदंश याच सापामुळे होतात कारण हे साप जमीनीवर असल्यास वातावरणाशी मिसळून जातात. हा साप चावल्यास रक्त आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो, शरीरात रक्तस्त्राव होऊ शकतो, शरीरावर सूज येते, हृदय आणि किडन्यांचे कार्य बिघडू शकते, त्यामुळे अवयव निकामी होऊ शकतात. बरेचदा हाताला अथवा पायाला सर्पदंश झाल्यास, वेळेवर उपचार न झाल्यास हात अथवा पाय गमवावा लागतों जीव जाण्याचा धोका असतो, असे हेल्प फॉर ॲनिमल वेलफेअर असोशिएशन नागपूरचे स्वप्नील बोधाने यांनी सांगितले.