‘शिवभावे जीव सेवा’ हे स्वामी विवेकानंद यांचे ब्रीद शिरोधार्य मानून गेल्या २२ वर्षांपासून मतिमंद मुलांमध्ये आर्थिक साक्षरतेचा अंकुर रुजवणाऱ्या ‘संज्ञा संवर्धन संस्थे’ने सामाजिक बांधिलकीचा वेगळा आदर्श घालून दिला आहे. संस्थेला नुकताच रमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

साधारणत: समाजाचा मतिमंदांकडे बघण्याचा दृष्टिकोण हेटाळणीचा किंवा सहानुभूतीचा असतो. एकंदरीत ‘बिनकामाचा’ असा त्यांच्यावर ठपका असतो. मात्र, या मनुष्यबळाला मायेचा हात देऊन त्यांच्यातील रोजगारक्षमता वृद्धिंगत ठेवण्याचे काम संस्था अनेक वर्षांपासून करीत आहेत. संस्थेत प्रविष्ठ होणाऱ्यांना शिक्षण, प्रशिक्षणाबरोबरच त्यांच्या पुनर्वसनावर भर दिला जातो. या विशेष मुलांना आजूबाजूच्या वातावरणातील बदल चटकन स्वीकारण्यास त्यांना अडचणी येतात. त्यामुळे दीर्घकालीन आधार त्यांना हवा असतो. बाहेर रोजगाराच्या संधी शोधताना मुलांमधील अस्थिरता आडवी येते. त्यामुळे नोकरी देणारा अपेक्षित वातावरण देऊ शकेल, अशी खात्री नसते. त्यांची ही अडचण ओळखून त्यांना करता येतील, अशी पाच प्रकारची कामे संस्थेतच सुरू करण्यात आली. स्क्रिन प्रिंटिंग, राखी तयार करणे, स्कुटरशी संबंधित काही तंत्र अवगत करून दिली जातात. महिन्याला एक ते तीन हजार रुपये ही मुले मिळवतात. संस्थेच्या मुली रक्षाबंधनसाठी वर्षभर राख्या बनवतात. सणाच्या १५ दिवसांपूर्वी त्याची विक्री सुरू होते. दोन-अडीच लाखाच्या राख्या विकतात. शिवाय ‘दिनशॉ’ या दुधाचे उत्पादन विकणाऱ्या कंपनीचे व्हिजिटिंग कार्ड, फाईल्स आणि इतर वस्तूही संस्थेतील ही विशेष मुले तयार करतात. यातून मिळणारा पैसा वर्षभर वेतनाच्या रूपाने दिला जातो.

संस्थेत प्रवेश सहजासहजी मिळत नाही तर प्रतीक्षा यादी असते. कारण पायाभूत सुविधा अपुऱ्या असल्याने दरवर्षी संस्थेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांची इच्छा पूर्ण करता येत नाही. एखाद्या मुलाचा मृत्यू किंवा आईवडील बदली होऊन गेल्यास जागा रिक्त होते. यावर्षी १०-१२ मुले या संस्थेत समाविष्ट करण्यात आली असून एकूण संख्या आता १०५ झाली आहे. त्यापैकी २० मुली आहेत.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश्वर उत्तरवार म्हणाले, सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून आम्ही हे काम स्वीकारले आहे. त्यासाठी खूप गाजावाजा करायची गरज वाटली नाही. व्यवस्थापनातील सात-आठ मंडळी आम्ही मोबदला घेत नाहीत. मात्र, संस्थेत शिपायापासून ते प्रशासकीय काम करणाऱ्यांपर्यंत चार ते साडेचार लाखाचा खर्च कोणतेही शासकीय अनुदान न घेता देणगीदारांकडून मिळणाऱ्या मदतीवर भागवला जातो. दान केवळ पैशाच्या रूपाने नाही तर वेगळ्यारूपानेही स्वीकारले जाते.

संज्ञा संवर्धन संस्थेला पुरस्कार

पुणे सेवासदन संस्था पुरस्कृत रमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्कार पांडे-लेआउटमधील ‘संज्ञा संवर्धन’ या मतिमंदांमध्ये काम करणाऱ्या संस्थेला जाहीर करण्यात आला आहे. उद्या, २ जानेवारीला, दुपारी ४ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ५१ हजार रुपयांचा हा पहिलाच पुरस्कार विदर्भस्तरीय आहे. पुणे सेवासदन संस्थेच्या अध्यक्ष कांचन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली.