नागपूर: नागपुरातील बाजारगाव परिसरात मोठया प्रमाणात एक्सप्लोझिव्ह कंपन्या आहेत. या कंपन्यामध्ये वारंवार होणाऱ्या स्फोटामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एैरणीवर आला आहे. घटना घडली की थातुमातुर चौकशी होते. परंतु यावर ठोस उपाययोजना करण्यात येत नाही यामुळेच स्फोटाच्या घटनेमध्ये वाढ होते. यामुळे जिल्यातील सर्व एक्सप्लोझिव्ह कंपन्यांचे सेफ्टी ऑडीट होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य व केंद्र सरकारने सेफ्टी ऑडीट करण्यासाठी एक तज्ञ समिती तयार करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना पत्र लिहुन मागणी केली आहे.
अनिल देशमुख यांनी या पत्राची प्रत केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्यासह एक्सप्लोझिव्ह कंपन्यामधील कामगारांची सुरक्षा तपासणीची जवाबदारी देण्यात आलेल्या पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संघटना, संरक्षण संशोधन आणि विकास संघटने अंतर्गत येत असलेल्या अग्नि, स्फोटक आणि पर्यावरण सुरक्षा केंद्र व राज्य सरकारच्या अंतर्गत येत असलेल्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांनाही दिली आहे. बाजारगाव परिसरात सध्या सोलार एक्सप्लोझिव्ह इंडस्ट्रीज लिमिटेड चाकडोह, बाजारगाव ता. जि. नागपूर, इकॉनॉमिक्स एक्सप्लोझिव्ह कंपनी, सावंगा (शिवा) ता.जि. नागपूर, केलटेक एक्सप्लोझिव्ह, गरमसुर ता. काटोल जि. नागपूर, चामुंडी एक्सप्लोसिव, धामणा ता. जि. नागपूर, डिफेन्स एक्सप्लोझिव्ह, सावंगा (शिवा) ता.जि. नागपूर, ओरिएंटेड एक्सप्लोझिव्ह, खापरी ता.जि. नागपूर, एशियन फायर वर्क, कोतवालबर्डी ता. काटोल जि. नागपूर, सोलर एक्सप्लोझिव्ह, राउळगाव ता. काटोल जि. नागपूर, एस.बी.एल. एक्सप्लोझिव्ह, राउळगाव ता. काटोल जि. नागपूर, अमिनो एक्सप्लोझिव्ह, ढगा बाजारगाव ता.जि. नागपूर या एक्सप्लोझिव्ह कंपन्या आहे. येथे वांरवार स्फोट होत असल्याने गेल्या दोन वर्षात जवळपास २३ कागारांचा नाहक मृत्यू झाला असून अनेक कामगारांना कायमचे अपंगत्व आले असल्याचीही माहिती देशमुख यांनी मंगळवारी नागपूरच्या रवी भवन येथे झालेल्या पत्र परिषदेत दिली.
दारुगोळा कंपनीत घडलेल्या घटना… सोलार कंपनीचा एक भाग असलेल्या इकॉनॉमिक्स एक्सप्लोझिव्ह कंपनी, सावंगा (शिवा) ता.जि. नागपूर येथे १२ ऑगष्ट २०२३ ला स्फोट होवून २ कामगार दगावले होते. १३ जुन २०२४ ला धामणा ता. जि. नागपूर येथील चामुंडा एक्सप्लोझिव्हमध्ये स्फोट होवून ९ कामगारांचा मृत्यू झाला. ६ फेब्रुवारी २०२५ ला कोतवालबर्डी ता. काटोल जि. नागपूर येथील एशियन फायर वर्कमध्ये झालेल्या स्फोटामध्ये २ कामगारांचा मृत्यू झाला होता. १७ डिसेंबर २०२४ ला सोलार एक्सप्लोझिव्ह इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये झालेल्या स्फोटात ९ कामगारांचा मृत्यू झाला होता. तसेच याच कंपनीत १९ जुन २०१८ मध्ये स्फोट झाल्याने एका कामगारांचा मृत्यू झाला होता. आता परत सोलार एक्सप्लोझिव्ह इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये ३ सप्टेंबर २०२५ ला स्फोट होवून दोन कामगाराचा मृत्यू झाला.