नागपूर : एखाद्या चित्रपटाला शोभावे, असे कथानक घडविणारी लुटेरी दुल्हन सध्या नागपुरात खमंग चर्चेचा विषय बनली आहे. कानो कानी सध्या याच लुटेरी दुल्हनची चर्चा आहे. एक दोन नव्हे तर आठ जणांभोवती प्रेमाचे जाळे टाकत त्यांच्याशी खोटा निकाह रचणारी समिरा फातिमा गेल्या दिड वर्षांपासून तपास यंत्रणेला चकमा देत होती. तीने आतापर्यंत जितका गंडा नवऱ्यांना घातला आहे, त्या आकड्यांची गोळाबेरीज करता करता पोलीसांचे डोके देखील चक्रावत आहे.
एखादी पाताळयंत्री स्त्री त्यातल्या त्यात शिक्षिका किती खालच्या थराला जाऊ शकते, हे पाहून पोलिसांना देखील रोज नवनवीन धक्के बसत आहेत. विशेष म्हणजे तिच्या फसवणूकीचा हिशेब लावणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक शारदा भोपळे या देखील महिला असल्याने त्यांनाही लुटेरी दुल्हनचे कारनामे पाहून रोज नव नवीन खुलासे होत आहेत. आतापर्यंत आठ जणांची सरासरी प्रत्येकी ४० ते ५० लाखांची लुबाडणूक करणारी लुटेरी दुल्हन समिरा फातिमा नवव्या पतीसोबत चहाचे झुरके मारताना हाती लागली. या सर्वांसोबत खोटा निकाह रचणारी समिरा दिड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होती.
ती पोलीसांच्या जाळ्यात कशी अडकली, याची कहाणी देखील रंजक आहे. तिन दिवसांपूर्वी दुपारी २:३० वाजता चहाची तलफ झाल्याने लुटेरी दुल्हन डॉलीच्या टपरीवर आली. नवव्या क्रमांकाच्या पतीसोबत कारमध्ये बसलेल्या समिरावर पोलिसांच्या खबऱ्याची नजर पडली. लुटेरी दुल्हन आरामात चहाचे झुरके मारत असतानाचा फोटो एका खबऱ्याने गिट्टीखदान पोलिसांना पाठवला. ही टीप मिळताच तिच्या मागावर असलेले गिट्टीखदान पोलिसांचे पथक डॉलीच्या टपरीवर धडकले. त्यावेळी कारमध्ये गाफीलपणे स्वतःचा चेहरा लपवून बसलेल्या लुटेरी दुल्हनला पोलीस उपनिरीक्षक शारदा भोपळे यांनी चहाचे झुरके मारता मारताच बेड्या ठोकल्या.
आठ जणांशी खोटा निकाहनामा
लुटेरी दुल्हन या नावाने कुप्रसिद्ध समीराने २०१० पासून आतापर्यंत ८ जणांसोबत निकाह रचला आहे. हे सगळे निकाह बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवले आहेत. या आठही जणांकडे असलेली निकाहनाम्याची रंगीत प्रतही बनावट आहे. विशेष म्हणजे ही लुटेरी दुल्हन व्यवसायाने शिक्षिका असल्याचे सांगते. त्यामुळे शिक्षकी पेशा डागाळला आहे.
लुटेरी दुल्हनचा असा झाला भांडाफोड
गुलाम गौस पठाण या आठव्या नवऱ्याला गंडा घालणाऱ्या फातिमाने २२ लाखांची आधी फसवणूक केली. गुलाम गौसकडून आणखी पैसे मिळत नसल्याने तिने गुलामची पहिली पत्नी आणि त्याच्या मुलाविरोधात कामठी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या आधारे पोलिसांनी गुन्हा देखील नोंदवून घेतला. मात्र गुलामने दाखवलेल्या कागदपत्रे पाहता पाहता पोलिसांनाच चक्कर आली. फातिमाने यापूर्वीही अनेकांना अशाच प्रकारे गंडवल्याचे पोलिसांना दिसले आणि तिथून लुटरी दुल्हनचे कारनामे बाहेर येणे सुरू झाले.
मुकाम -ए – सरकारी सासुरवाडी!
विशेष म्हणजे भोपळे यांची टीम गेल्या दीड वर्षांपासून लुटेरी दुल्हनच्या मागावर होती. दिड वर्षांपूर्वी गिट्टीखदान पोलिसांनी तिला अटक केली होती. मात्र त्यावेळी ती गरोदर असल्याने तिला सोडून देण्यात आले. तेव्हा पासून लुटेरी दुल्हन पोलिसांना गुंगारा देत होती. फातीमाने आतापर्यंत इम्रान अंसारी, नजमुम साकीब, रहेमान शेख, मिर्झा अशरफ बेग, मुदस्सीर मोमिन, मोहम्मद तारिक अनिस, अमानुल्लाह खान, गुलाम गौस पठाण आणि आणखी एक अशा आठ जणांशी निकाल करीत त्यांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. तिला ताब्यात घेतल्यानंतर गिट्टीखदान पोलिसांनी न्यायालयासमक्ष उभे केले. सध्या फातिमा न्यायालयीन कोठडीत सरकारी पाहुणचार घेत आहे.