चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे सम्राट लॉनमध्ये सुरू असलेला सम्राट क्लब हा रमी खेळण्यासाठीचा मनोरंजन क्लब असून जिल्हाधिकारी कार्यालयातून मनोरंजन कर भरून रीतसर व नियमानुसार परवाना घेतला आहे. या क्लबमध्ये जुगार अड्डा सुरू नाही. तसेच अन्य कुठलाही अवैध प्रकार सम्राट क्लबमध्ये होत नाही, अशी माहिती क्लबचे संचालक सोमेश्वर आईटलावार यांनी निवेदनाद्वारे दिली.
राजुऱ्यातील सम्राट क्लबमध्ये आंतरराष्ट्रीय जुगार अड्डा सुरू असल्याचे वृत्त प्रसार माध्यमांमध्ये प्रकाशित झाले आहे. या संदर्भात क्लबचे संचालक सोमेश्वर आईटलावार व ॲड. मनोहर आईटलावार यांनी राजुरा पत्रकार संघात पत्रपरिषद घेऊन आपली भूमिका मांडली. सम्राट क्लबची राजुरा व चंद्रपूर येथील पोलीस अधिकाऱ्यांनी अनेकदा पाहणी व तपासणी केली. हा क्लब नियमानुसार चालत असल्याचा निर्वाळा दिला. राजुरा हे तेलंगणा सीमेजवळ असल्याने या भागातील लोक सदस्यत्व स्वीकारून मनोरंजन करण्यासाठी रमी खेळायला येथे येतात. मनोरंजनासाठी रमी खेळल्यामुळे याला काही आंतरराज्यीय जुगार अड्डा म्हणता येणार नाही. येथे कोणत्याही पैशाची बाजी खेळली जात नाही. हा क्लब तीन दिवस नव्हे तर आठवडाभर नियमानुसार अटीचे व शर्तीचे पालन करून सुरू असतो. नियमानुसार क्लब चालत असल्यानेच पोलिसांनी तपासणी करून आमच्या क्लबवर आजपर्यंत कुठलीही कारवाही केली नाही, असेही आईटलावार म्हणाले. आमच्या क्लबवर महाराष्ट्र अथवा तेलंगणा पोलिसांनी धाड घालून कुठलीही कारवाई केली नाही. क्लबमधून कुणालाही अटक नाही, कार जप्ती नाही. कोणत्याही महिला मंडळ, गावकरी, विद्यार्थी यांची तक्रार नाही. गावापासून क्लब एक किलोमीटर दूर आहे. या क्लबमध्ये डिजेवर गाणी, विदेशी मद्य, किंवा तरुणींचा वावर नसतो. माझ्या लॉनच्या समोर चार बिअर बार व शॉपी आहेत.
सध्या क्लब सुरळीत सुरू असून याबाबत चुकीचा दावा करण्यात आला आहे. क्लबचा परवाना मनोरंजन कर भरून घेतलेला आहे, आमच्या क्लबचा परवाना कधीही रद्द झाला नाही. वास्तविक राजुरा तालुक्यातील वरूर रोड या गावी सोशल क्लब या नावाने नियमबाह्य सुरू असलेल्या क्लबवर पोलिसांनी कारवाई केली होती. त्या कारवाईशी आमच्या क्लबचा कोणताही संबंध नाही. आम्ही कोणत्याही पोलीस अधिकारी, पदाधिकारी यांना कोणतेही आमिष दिले नाही, असे आईटलावार म्हणाले. आमचे कुटुंब राजुरा शहरात अनेक वर्षांपासून राहत असून आम्ही राजकारणातही सक्रिय आहोत, असेही सोमेश्वर आईटलावार यांनी निवेदनात म्हटले आहे.