यवतमाळ : शिवसेना (उबाठा)चे संजय देशमुख हे यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहतील, हे आज बुधवारी अधिकृतपणे स्पष्ट झाले. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील १६ उमेदवारांची घोषणा केली. त्यात यवतमाळ – वाशीम लोकसभा मतदारसंघातून संजय देशमुख यांना संधी मिळाली आहे. संजय देशमुख हे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीस सामोरे जात आहेत.

संजय देशमुख यांची राजकीय कारकीर्द ही शिवसेनेतून सुरु झाली असली तरी ते अपक्ष म्हणून राजकारणात सक्रिय झाले. १९९९ आणि २००४ मध्ये त्यांनी अपक्ष आमदार म्हणून दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. १९९९ मधील राजकीय समीकरणांत अपक्षांनी आघाडीला पाठिंबा देवून मंत्रीपदे पारड्यात पाडून घेतली होती. त्या मोहिमेचे नेतृत्व विदर्भातील दोन आमदारांनी केले, त्यात संजय देशमुख आघाडीवर होते. पहिल्यांदाच आमदार बनलेले संजय देशमुख त्या वाटाघाटीत थेट राज्यमंत्री झाले. तेव्हापासून संजय देशमुख यांचा राजकीय उत्कर्ष मतदारसंघाने पाहिला. राज्यमंत्रीपदानंतर अल्पावधीतच ते शिक्षण सम्राट म्हणूनही नावारूपास आले.

हेही वाचा – मंत्री सुधीर मुनगंटीवारांकडे केवळ ९० हजार रुपये रोख, बंगल्याची किंमत ५ कोटी ६० लाख, चारचाकी वाहन नाही…

२००८ मध्ये मतदारसंघ पुनर्ररचेनंतर दिग्रस विधानसभा मतदारसंघाची मोडतोड झाली. त्यानंतर मात्र या मतदारसंघात शिवेसेनेचे संजय राठोड यांनी वर्चस्व मिळविले ते अद्यापही टिकून आहे. २००९ नंतर दिग्रस मतदारसंघात संजय देशमुख यांची राजकीय पकड सैल झाली. त्यांनी कायम पक्षबदल केले. काँग्रेसमध्येही ते पदाधिकारी राहिले. काँग्रेसकडून दिग्रस विधानसभा मतदारसंघात निवडणूकही लढविली. शिवेसनेत फूट पडल्यानंतर त्यांच्यातील मूळ शिवसैनिक जागा झाला आणि त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य करीत शिवसेना (उबाठा) मध्ये प्रवेश घेतला. शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांची २०२३ मध्ये दिग्रस येथे जाहीर सभा झाली. त्यांनतरही त्यांनी अलिकडे जिल्ह्यात तीन सभा घेतल्या. संजय राठोड यांचा पारंपरिक राजकीय शत्रू म्हणून उद्धव ठाकरे यांनी संजय देशमुख यांना बळ दिले. दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे कायम वर्चस्व राहिल्याने येथून शिवसेना (उबाठा)कडून संजय देशमुख हेच लोकसभा आणि भविष्यात विधानसभेचेही उमदेवार राहितील, हे स्पष्ट केले. आज शिवसेना उबाठाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत संजय देशमुख यांचे नाव झकळले आणि गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या महाविकास आघाडीचा उमेदवार नक्की कोण राहणार, या चर्चांना विराम मिळाला.

हेही वाचा – रायगडमध्ये सुनील तटकरेंना उमेदवारी, भाजपमध्ये निराशा

हेही वाचा – मोदींचा फोटो खतांच्या बॅगवर, आचारसंहिता भंग म्हणून…

संजय देशमुख हे महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार राहणार हे स्पष्ट झाल्याने महायुती कोणाला उमदेवारी देते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. महायुतीत अद्यापही उमेदवारीचा घोळ सुरू आहे. बंजारा की, कुणबी कार्ड, यावर महायुतीचे घोडे अडले असल्याची चर्चा आहे. बंजारा कार्ड चालविले तर संजय राठोड किंवा त्यांच्या पत्नी शीतल राठोड या उमेदवार राहितील आणि कुणबी कार्ड चालविले तर मनीष पाटील यांना काँग्रेसमधून आयात करून शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. महायुतीने कुणबी कार्ड चालविल्यास महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक अडथळ्यांची शर्यत ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.