अमरावती : अमरावती लोकसभा मतदार संघामध्‍ये काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांची लढाई ही एका ‘नाची’सोबत असल्‍याची टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा यांच्‍याविषयी बोलताना संजय राऊत यांची जीभ घसरली. नवनीत राणा यांचा उल्‍लेख करताना त्‍यांनी ‘नाची’, ‘डान्‍सर’, बबली अशा शब्‍दांचा वापर केला.

काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्‍या प्रचारार्थ येथील संत ज्ञानेश्‍वर सांस्‍कृतिक सभागृहात आयोजित मेळाव्‍यात ते बोलत होते. संजय राऊत म्‍हणाले, ही निवडणूक बळवंत वानखडे आणि नाची विरोधातील नाही, एका डान्‍सर विरोधातील नाही. एका बबली विरोधातील नाही, तर ही लढाई मोदी विरूद्ध महाराष्‍ट्र अशी आहे. ही लढाई मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, मोदी विरुद्ध शरद पवार, मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी असल्याचे देखील संजय राऊत यांनी सांगितले.

हेही वाचा…नागपुरात आक्रित…रामनवमीच्या शोभायात्रेत पोलिसांवर दगडफेक! पोलिसांकडून लाठीचार्ज…

ज्‍या बाईने हिंदुत्‍वाविषयी अपशब्‍द वापरले, मातोश्रीला आव्‍हान देण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍या बाईचा पराभव करणे हे शिवसैनिकांचे पहिले आणि नैतिक कर्तव्‍य आहे. तिच्या पराभवात शिवसेनेचे योगदान मोठे असला पाहिजे, हा बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश असल्याचे लक्षात ठेवा, असे देखील खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत म्हणाले की, मोदी नावाचा राक्षस घालवायचा असेल तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा खासदार निवडून दिला पाहिजे. भाजपला शिवसेनेने महाराष्ट्रात मोठे केले मात्र त्यांनी गद्दारी केल्यामुळे त्यांच्याशी असलेली युती तोडली. महाराष्ट्र हा कधीच कुणासमोर झुकलेला नाही परंतु मोदी, शहा यांनी शिवसेनेसोबतच राष्ट्रवादीला देखील कमजोर करण्याचा प्रयत्न केला. हे फक्त पक्ष फोडाफोडी मध्ये ५६ इंचाची छाती दाखवतात तिकडे चीनचे सैनिक लडाख मध्ये शिरले परंतु मोदी तोंड उघडत नाही कारण मोदी हे डरपोक असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा…यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शस्त्रक्रिया गृहास आग, रूग्ण नसल्याने जीवितहानी टळली

यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांनी देखील राणा दाम्पत्यावर शाब्दिक वार केले. भूखंड माफिया म्हणून राणाची ओळख आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये हिरो हिरोइन यांना नाचवायचे आणि संस्कृती खराब करायची ही मानसिकता राणा दाम्पत्यांची आहे, घाणेरडे राजकारण करून अमरावतीची प्रतिष्‍ठा धुळीस मिळवणाऱ्या नवनीत राणा यांचा पराभव अटळ असल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.