नागपूर : कामठी विधानसभा मतदारसंघात चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुपुत्र संकेत यांनी शेकडोच्या संख्येत बनावट मतदार तयार केले आहेत. त्यांनी स्वत: ७ क्रमांकाचे ‘फॉर्म’ भरून दिले आहेत. संकेत बावनकुळे यांनी ७ क्रमांकाचे किती फार्म भरून दिले. याची माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी अश्विन बैस यांनी केली.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघातील मतदार यादीमध्ये घोळ आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे पुराव्यानिशी अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु मतदार यादीचे काम महसूल खात्याचे अधिकारी करत असल्याने ते दबावात असून यादीत बनावट मतदारांची नावे वगळण्यात येत नसल्याचा आरोप नागपूर जिल्हा (ग्रामीण) काँग्रेसचे अध्यक्ष अश्विन बैस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष कुंदा राऊत, माजी शिक्षण सभापती अवंतिका लेकुरवाळे उपस्थित होते.
बावनकुळे यांनी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना एकेरी शब्दाचा वापर केला. आम्ही त्याचा निषेध करतो. राहुल गांधींनी पुराव्यासह देशाच्या जनतेसमोर मतचोरी उघड केली आहे. पुरावे समोर येत असल्याने बावनकुळे घाबरले आणि कदाचित त्यांना पुढचा नंबर कामठी विधानसभेचा असेल, असे वाटत असेल. आम्ही तुमची भीती समजू शकतो कारण कामठी विधानसभा मध्ये मत चोरी झाली आहे, असे बैस म्हणाले.
लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यातील अंतर पाच महिन्याचे आहे. या कालावधीत ३३ ते ३५ हजार मतांची वाढ झाली. या वाढलेली मतदारांची यादी ‘बीएलओच्या व्हेरिफिकेशन रिपोर्ट’ सह उपलब्ध करून देण्यात यावी. लोकसभा ते विधानसभा मतदार यादीतून वगळण्यात आलेले एकूण मतदार किती व कोणते ही यादी उपलब्ध करून देण्यात यावी. वगळण्यात येणाऱ्या मतदारांच्या तक्रारकर्त्यांची नावे, त्या तकारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
विधानसभेच्या निवडणुकांकीपूर्वी माजी आमदार विजय घोडमारे यांनी हिंगणा विधानसभा मतदार संघात २० ते २२ हजार बनावट मतदारांची यादी पुरव्यानिशी दिली. त्यामधून १ ते २ हजार मतदार वगळण्यात आले, अजून २० हजार बनाट मतदार आहे. बावनकुळेंच्या जिल्ह्यात एवढे बनावट मतदार असल्यानंतर व ते न्यायालयमध्ये सिद्ध झाल्यानंतर राहुल गांधी यांचा विरोधात तुम्ही जे बोलले ते कीव करण्यासारखे आहे, असेही ते म्हणाले.
फडणवीस स्वत:च सिरीयल लायर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना ‘सिरीयल लायर’ म्हटले आहे. वेगळा विदर्भ होत नाही तो पर्यंत लग्न करणार नाही, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करणार म्हणणारे फडणवीस स्वत:च ‘सिरीयल लायर’ आहेत, असा आरोपही त्यांनी केला.