बुलढाणा : विदर्भ पंढरी म्हणून राज्यात ख्यातीप्राप्त असलेले शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थांनाने अध्यात्म, संस्कृती जोपसाण्याचे काम अव्याहत जोपासले आहे. तसेच वारकरी, भक्तसेवेची मौलिक परंपरा देखील जपली आहे. गजानन माऊली भक्ताच्या संकटात धावून येतात ही लाखो भाविकांची श्रद्धा आहे.

हीच परंपरा संत गजानन महाराज संस्थान अर्थात विश्वस्त मंडळाने देखील जोपासली आहे. सध्या राज्यातील लाखो शेतकरी, नागरिक, भाविक अतिवृष्टी, महापूराने संकटात सापडली आहे. यावर्षी महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः थैमान घालत अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण केली. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शासनाने पुरग्रस्तांना मदतीचे आवाहन केले आहे. या सर्वांच्या घोर संकटात त्याच्या मदतीसाठी गजानन महाराज संस्थानाने धाव घेतली आहे.

शेगावचे आध्यात्मिक व सामाजिक प्रेरणास्थान असलेल्या संत गजानन महाराज संस्थानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस तब्बल १ कोटी ११ लाख रुपयांची मदत दिली आहे. हा धनादेश २७ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुपूर्द करण्यात आला आहे. श्री संत गजानन महाराज संस्थान हे केवळ धार्मिक कार्यापुरते मर्यादित नसून, सेवाभावी व समाजोपयोगी उपक्रमात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. संस्थानचे अन्नछत्र, शिक्षणक्षेत्रातील योगदान, आरोग्यसेवा, जलपुरवठा योजना आणि आपत्ती व्यवस्थापनातील सहकार्य या सर्व कार्याचा देशभरातून गौरव होत आहे. यापूर्वीही दुष्काळ व पूरस्थितीत संस्थानने शासनाला भरीव मदत दिली होती.

श्री गजानन महाराजांचा संदेश हा भक्ती, सेवा आणि समर्पणाचा आहे. त्याच धर्तीवर संस्थानने संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जात “सेवा हाच धर्म” हा बोध प्रत्यक्ष कृतीत उतरवला आहे. या भरीव योगदानामुळे पुरग्रस्तांना दिलासा मिळणार असून, समाजात सेवाभावी व स्वच्छतेच्या कार्यात आघाडी घेणारे संस्थान हे खरेच प्रेरणास्थान ठरले आहे.

अध्यात्मिकच नव्हेतर स्वच्छतेचीही राजधानी

विशेष म्हणजे, स्वच्छतेच्या बाबतीत श्री संत गजानन महाराज संस्थान देशात क्रमांक एकचे मानले जाते. संस्थान परिसरातील स्वच्छता, सुव्यवस्था आणि हरिताई याचे अनुकरण देशभरातील विविध संस्था करतात. येथे येणारा भाविक स्वच्छता, शिस्त आणि शांततेचा अनुभव घेतो. त्यामुळेच संत नगरी शेगाव ही केवळ अध्यात्मिक नाही तर स्वच्छतेचीही राजधानी मानली जाते.