वर्धा : सावंगी येथील मेघे विद्यापीठाचा गणेशोत्सव हा विदर्भात नावाजलेला. इंदोरची प्रसिद्ध रोषणाई, दिव्यांचा लखलखाट, कलाकारांची धूम, विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, लोकांची उत्साही गर्दी व अन्य बाबी या उत्सवास लोकप्रिय करणाऱ्या ठरल्या. संस्था प्रेरक दत्ता मेघे हे त्यामागचे कारण. पण यावर्षी प्रसिद्ध अदानी उद्योग समूहाची भागीदारी संस्थेत आली आणि उत्सवाबाबत तर्कवितर्क व्यक्त होणे सूरू झाले. हा प्रोफेशनल पद्धतीने कार्य करणारा समूह असे धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यासाठी पदरमोड करणार कां, अशी शंका व्यक्त झाली.
मात्र हा उत्सव याच पद्धतीने दरवर्षी साजरा होत आला आहे. त्यास विद्यार्थी, पालक व नागरिक भरभरून प्रतिसाद देतात. त्यामुळे समूहाने हात आखडता घेतला नसल्याची माहिती पुढे आली. मात्र भागीदार जर तयार नसेल तर जेवढे शक्य तेवढे घेत उर्वरित मेघे परिवार देईल, असे कुलपती दत्ता मेघे म्हणाल्याचे ऐकायला मिळाले. सर्वांचा जीव मग भांड्यात पडला. जय्यत तयारी झाली. आज सकाळी ‘ सिंदूर ‘ गणेश सावंगीत साग्रसंगीत अवतरला. कुलपती दत्ता मेघे व पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांची पूर्णवेळ उपस्थिती होती. अदानी समूहाचे येथील संचालक व मूळचे अहमदाबाद येथील सौरव गांधी यांचीही हजेरी लागली.
सायंकाळी ७ वाजता आरोग्यम् धनसंपदा या ज्ञानविज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन होईल. दररोज सकाळी ‘एक पेड मां के नाम’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता कुलपती दत्ता मेघे यांच्या हस्ते होईल. अभिमत विद्यापीठांतर्गत कार्यान्वित अकरा महाविद्यालयांमधील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होत दररोज वृक्षारोपण करतील. तर, सायंकालीन सत्रात विविध प्रांतातील लोककला, संगीत रजनी, नाटिका, नृत्य व अन्य कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे. संगीतप्रेमींसाठी विशेष आकर्षण असलेली स्वरवैदर्भी लिटिल चॅम्प विदर्भस्तरीय सिनेगीत गायन अंतिम स्पर्धा शनिवार, दि. ३० ला सायंकाळी ७ वाजता होणार असून विदर्भातील प्रतिभावंत बालकुमार गायक गायिका यात सहभागी होणार आहेत.
गणेशोत्सवादरम्यान दहा दिवसांच्या काळात नागरिकांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी जनजागृतीपर कार्यक्रमांचा तसेच आरोग्यदायी शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डाॅ. ललित वाघमारे, कुलसचिव डॉ. श्वेता काळे पिसूळकर, प्रशासकीय महासंचालक डाॅ. राजीव बोरले, विशेष कार्य अधिकारी संजय इंगळे तिगावकर, रुग्णालय समूह संचालक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर व आयोजन समितीद्वारे करण्यात आले आहे.