देवेश गोंडाणे
नागपूर : पुढच्या २५ वर्षांत भारत ज्या उंचीवर असेल त्यात वैज्ञानिक शक्तीची भूमिका सर्वात महत्त्वपूर्ण असेल. जेव्हा विज्ञानात समर्पण वृत्तीला देशसेवेचा संकल्प जोडला जातो तेव्हा त्याचे परिणाम अभूतपूर्व असतात. त्यामुळे आम्हाला विज्ञान प्रयोगशाळेतून बाहेर काढून सर्वसामान्यांपर्यंत पोहचवावे लागेल, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. अमृतकाळात भारत आधुनिक विज्ञानाची जगातील सर्वात मोठी प्रयोगशाळा ठरेल, असा विश्वास पंतप्रधानांनी १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करताना व्यक्त केला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडे यजमानपद असलेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे मंगळवारी थाटात उद्घाटन झाले. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी मोदी यांनी विज्ञानातील दोन महत्त्वपूर्ण गोष्टींचा उल्लेख केला. ते म्हणाले, आज एसविसाव्या शतकात भारतात दोन गोष्टींना विशेष महत्व आहे त्या म्हणजे ‘डेटा’ आणि दुसरे म्हणजे तंत्रज्ञान. या गोष्टी भारतीय विज्ञानाला निश्चितच नवीन उंचीवर नेऊ शकतात. आजचा भारत वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन पुढे जात आहे. त्याचे परिणाम आपण पाहत आहोत. विज्ञान क्षेत्रात भारताने जगातील पहिल्या १० देशांमध्ये स्थान मिळवले आहे. २०१५ पर्यंत १३० देशांमध्ये भारत ‘ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स’मध्ये ८१ व्या स्थानावर होता. २०२३ मध्ये, आम्ही ४० व्या स्थानावर झेप घेऊ. तर पीएच.डी. आणि स्टार्टअप इकोसिस्टममध्ये भारत पहिल्या तीन देशांमध्ये आहे, अशी माहितीही मोदी यांनी दिली. भारतीय विज्ञान काँग्रेसची यावेळची संकल्पना ‘शाश्वत विकास’ ही आहे. यामध्ये महिला सक्षमीकरणाचा मुद्दा जोडला आहे. महिला सक्षमीकरण मोठय़ा प्रमाणात व्हायला हवे. त्यासाठी विज्ञानाचा उपयोग होऊ शकतो. मात्र, केवळ विज्ञानातून महिला सक्षमीकरण नव्हे तर महिलांच्या सहभागातून विज्ञानाचे सक्षमीकरण व्हावे, असेही पंतप्रधान म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, संशोधनाला चालना देण्यासाठी राज्य सरकार कायम सकारात्मक आहे. इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनच्या सरचिटणीस डॉ. विजय लक्ष्मी सक्सेना यांनी स्वागतपर भाषण केले. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी प्रास्ताविक केले.
विज्ञानाच्या मंचावर अध्यात्माचे गोडवे
आपले ऋषीमुनी वेळ आणि अंतराळापेक्षाही पुढच्या गोष्टी पाहू शकत होते. अशीच दृष्टी वैज्ञानिकांनी निर्माण करावी, असा सल्ला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिला. इतक्यावर न थांबता ते आध्यात्मावर आले. विश्वाचे आध्यात्मिक नेतृत्व भूषवणाऱ्या भारताकडे एकविसाव्या शतकातील जगाचे नेतृत्व असेल हा अशावाद खरा ठरत आहे असे राज्यपाल म्हणाले.
‘जीएम’शिवाय अन्नसुरक्षा अशक्य!
जनुकीय सुधारित (जीएम) बियाण्यांशिवाय देशात अन्न सुरक्षा निर्माण होणे अशक्य आहे. या मुद्यांवर आपल्या देशात शास्त्रीयदृष्टय़ा विचार न होता, त्यावर भावनिक चर्चाच अधिक होते, असे मत देशाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय सूद यांनी व्यक्त केले. इंडियन सायन्स काँग्रेसनिमित्त ते पत्रकारांशी बोलत होते. एका मोठय़ा लढय़ानंतर जीएम मोहरी आली आहे. आपल्याला अन्नसुरक्षा हवी असेल, खाद्यतेलांची आयात कमी करायची असेल तर जीएम बियाणे, जीएम मोहरीला दुर्लक्षित करू शकत नाही. शास्त्रीय बाजू वेगळे सांगते आणि दुसरीकडे पुराव्याशिवाय विधाने केली जातात, असे सूद यांनी नमूद केले.
विज्ञानातून आत्मनिर्भरता
देशाच्या गरजा पूर्ण करणे तसेच देशाला आत्मनिर्भर बनवणे या दृष्टिकोनातून भारतीय विज्ञानाचा प्रवास व्हायला हवा. विज्ञानाच्या माध्यमातून भारताला स्वावलंबी बनवणे ही आपल्या वैज्ञानिक समुदायाची मूळ प्रेरणा असली पाहिजे. त्या दृष्टीने भारतातील विज्ञानाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचा ‘टॅलेंट हंट’सारख्या आयोजनातून शोध घेऊन त्यांच्या क्षमतांचा विकास करणे यावर भर देण्यात येईल.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान