अकोला : सेंद्रिय कापूस उत्पादनातील अकोल्याची ख्याती आता सातासमुद्रापार गेली आहे. वऱ्हाडात उत्पादित होत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण सेंद्रिय कापसाची माहिती जाणून घेण्यासाठी इंग्लंडमधील शास्त्रज्ञांनी थेट अकोल्यातील कृषी विद्यापीठ गाठले. विद्यापीठाच्या शिवार फेरीत सहभागी होत त्यांनी सेंद्रिय कापसाची सखोल माहिती जाणून घेतली. मँचेस्टर व अकोल्यातील कृषी विद्यापीठाद्वारे एकत्रित कार्य केले जाणार आहे.

वऱ्हाडातील अकोल्याची एकेकाळची ‘कॉटन सिटी’ अशी ओळख होती. कालांतराने ही ओळख पुसत गेली. कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीनकडे वळला. कापसापेक्षा सोयाबीनचा पेरा वाढला आहे. कापसाचा पेरा विविध कारणाने घटला असला तरी त्याचे महत्व आजही कायम आहे. सेंद्रिय कापूस उत्पादनासंदर्भात कृषी विद्यापीठाने भरीव कार्य केले. ते जाणून घेण्यासाठी इंग्लंडच्या शास्त्रज्ञ अकोल्यात दाखल झाल्या होत्या.

इंग्लंडमधील मँचेस्टर विद्यापीठाच्या प्रा. डॉ. एरिना टोझी भारतात आल्यावर सेंद्रिय कापसाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी त्या अकोल्यातील कृषी विद्यापीठात पोहोचल्या. विद्यापीठाच्या सेंद्रिय शेती, कापूस संशोधन आणि विविध प्रात्यक्षिक याची सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली. शाश्वत कापूस शेती यासाठी त्या कार्य करीत आहेत. त्या दृष्टीने विद्यापीठासोबत कार्य करण्याची इच्छासुद्धा त्यांनी कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्याजवळ व्यक्त केली. यावेळी पुणे येथील निरुती चव्हाण, कृषी विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय संस्था समन्वयक प्रा. डॉ. नितीन कोंडे आदी उपस्थित होते.

प्रामुख्याने सेंद्रिय पद्धतीद्वारे उत्पादित कापूस पिकासाठी एकत्रित कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. मँचेस्टर विद्यापीठात कापूस पिकाच्या मूल्यवर्धन तसेच कापड तयार करण्यासाठी संशोधन केले जाते. त्यामुळे एकत्रित कार्य केल्यास कापूस उत्पादक क्षेत्रात याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सेंद्रिय पीक पद्धतीचे आकर्षण

मँचेस्टर विद्यापीठाच्या डॉ. एरिना टोझी यांनी विद्यापीठाच्या शिवार फेरीमध्ये सहभाग घेऊन भारतातील पारंपरिक पीक पद्धती जाणून घेतली. सेंद्रिय उत्पादनाविषयी त्यांना विशेष आकर्षण होते. नवतंत्रज्ञानाची माहिती देखील त्यांनी घेतली. यामुळे कृषी विद्यापीठाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्याप्ती अधोरेखित झाली आहे.

विदर्भातील दर्जेदार कापसाचा नावलौकिक

मँचेस्टर विद्यापीठाच्या डॉ. एरिना टोझी यांनी कृषी विद्यापीठातील प्रामुख्याने सेंद्रिय उत्पादनाची माहिती जाणून घेतली आहे. यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय पातळीवर विदर्भातील दर्जेदार कापसाचे नावलौकिक पोहोचले. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल, अशी प्रतिक्रिया डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी व्यक्त केली.