लोकसत्ता टीम

अकोला : मागील वर्षी नैसर्गिक आपत्ती ओढवल्याने बियाणे उत्पादन घटले आहे. मजुरांचा अभाव देखील राहिल्याने बियाणे उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. हंगामात लागणाऱ्या कपाशीच्या अपेक्षित बियाण्यांच्या तुलनेत केवळ २२ टक्केच विशिष्ट वाण संबंधित कंपनीने उपलब्ध करून दिले. त्यामुळे बियाण्यांचा प्रचंड तुटवडा जाणवत असून प्रशासनाची कोंडी झाली. बियाण्यांसाठी शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.

खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून येते. यंदा शेतकऱ्यांचा कापूस पिकाकडे ओढा आहे. शेतकरी पहाटेपासून कृषी केंद्रावर बियाणे खरेदीसाठी रांगा लावून देखील बियाणे मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. खरीप हंगामासाठी कपाशीच्या एकाच कंपनीच्या बियाण्यांची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बियाणे पुरवठ्यावर मर्यादा आल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. मागील वर्षी नैसर्गिक आपत्ती, मजुराचा अभाव यामुळे बियाणे उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. उत्पादित बियाणे गुणनियंत्रण विभागाच्या अहवालानुसार बाजारात उपलब्ध करून देण्यात आले. निर्धारित किमतीनेच विक्री करावी व कुठेही कृत्रिम टंचाई करू नये, अशा सूचना विक्रेत्यांना करण्यात आल्या. त्या सूचनांना केराची टोपली दाखवून बियाण्यांचा काळाबाजार केला जात आहे.

आणखी वाचा-वीज केंद्रातील वृक्ष करपली, कंत्राटदार भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षाचा जाणून घ्या प्रताप…

जिल्ह्यात १६ मेपासून एकाच वाणाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. गेल्या खरीप हंगामामध्ये या बियाण्यांचा दोन लाख ६० हजार पाकिटांचा पुरवठा केला होता. मात्र, यंदा या कंपनीने केवळ एक लाख २३ हजार ७०० पाकिटे पुरवठ्याचे नियोजन सादर केले. कापूस बियाण्यांचा अधिकाधिक पुरवठा करण्याबाबत सूचना देण्यात आली. त्यानंतर सुधारित नियोजन करून एक लाख ५२ हजार पाकिटांचा पुरवठा अकोला जिल्ह्यात केल्या गेला. कृषी, महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांसमक्ष शेतकऱ्यांना टोकन वाटप करून बियाण्याची विक्री करण्यात आली. अधिक पुरवठा करणे शक्य नसल्याचे विभागीय कृषी सहसंचालकांना कळवून कंपनीने ऐन हंगामाच्या तोंडावर हात वर केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६.७७ लाख बियाणे पाकिटांची गरज

आगामी खरीप हंगामात अकोला जिल्ह्यात कपाशी पिकाचे एक लाख ३५ हजार ५०० हे.क्षेत्र प्रस्तावित आहे. त्यानुसार प्रतिहेक्टर पाच बियाणे पाकिटानुसार सहा लाख ७७ हजार ५०० पाकिटांची मागणी कृषी आयुक्तालयाला करण्यात आली. त्याबाबत पुरवठादार बियाणे उत्पादक कंपन्यांकडून पुरवठ्याचे नियोजनही प्राप्त करून घेण्यात आले. त्यानुसार कंपन्यांनी सात लाखांहून जास्त बियाणे पुरवठा करण्याचे नियोजनात नमूद केले. मात्र, प्रत्यक्षात बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे.