नागपूर : नागपूरच्या जामठा येथील व्हीसीए मैदानावर शुक्रवारी थरारक सामना पहायला मिळाला. नेको मास्टर ब्लास्टर आणि भारत रेंजर्स संघातील उपांत्य फेरीचा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत कर्णधार जितेश शर्मा याने नेको मास्टर ब्लास्टर संघाला ६ गडी राखून अविस्मरणीय विजय मिळवून दिला. या विजयासह नेको मास्टर ब्लास्टर संघाने विदर्भ प्रो टी२० लीगच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.

भारत रेंजर्सने विजयासाठी दिलेले २०५ धावांचे आव्हान नेको मास्टर ब्लास्टर संघाने ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. जितेश शर्माने २२ चेंडूत ४६ धावांची मॅच विनिंग खेळी साकारली. जितेश शर्माला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. विजयासाठी मिळालेल्या आव्हानाचा पाठलाग करताना नेको मास्टर ब्लास्टर संघाला वेदांत दिघाडे आणि अद्यन डागा यांनी दमदार सुरुवात करून दिली.

भारत रेंजर्सच्या गोलंदाजांना फोडून काढत दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६.५ षटकात ८४ धावा जोडल्या. वेदांत दिघाडेने २१ चेंडूमध्ये ३५ धावा केल्या, तर अद्यन डागा याने अर्धशतकीय खेळी केली. बाद होण्यापूर्वी त्याने ३८ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या. शेवटच्या षटकात नेको मास्टर ब्लास्टरला ११ धावांची गरज होती. समोरून विकेट जात असतानाही जितेशने मनावर नियंत्रण ठेवले आणि अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना षटकार मारत संघाला विजयी केले. या विजयासह नेको मास्टर ब्लास्टरने अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले.

तत्पूर्वी भारत रेंजर्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ३ बाद २०४ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारले. सलामीला आलेल्या अथर्व तायडे यांनी ५३ चेंडूत नाबाद ९४ धावा केल्या. अखेरच्या काही षटकांमध्ये वरुण बिष्ट याने चौफेर फटकेबाजी करत १५ चेंडूत ५० धावा काढल्या. तत्पूर्वी फलंदाजीला आलेल्या नील आठले याने ३९, उपदेश राजपूत १४ आणि दानिश मालेवार याने २ धावांचे योगदान दिले. नेको मास्टर ब्लास्टरकडून अनामय जयस्वाल याने सर्वाधिक २, तर आर. संजयने एक गडी बाद केले. आता अंतिम फेरीत नेको मास्टर ब्लास्टर संघाचा सामना पगारिया स्टायकर्स आणि ऑरेंज टायगर्स संघात होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य लढतीतील विजयी संघाशी होईल.

रविवारी सायंकाळी ७.४५ वाजता जेतेपदाचा सामना सुरू होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.