गडचिरोली : या महिन्याच्या मध्यात गडचिरोली आणि छत्तीसगडमध्ये वरिष्ठ नक्षल नेता भूपती उर्फ सोनू आणि केंद्रीय समिती सदस्य रुपेश उर्फ आशन्ना याच्यासह तब्बल २७० सशस्त्र नक्षलवाद्यांनी केलेले आत्मसमर्पण हा चळवळीला बसलेला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. या अभूतपूर्व शरणागतीमागे केवळ सुरक्षा दलांची वाढती कारवाईच नव्हे, तर संघटनेत २०११ पासूनच सुरू असलेली तीव्र वैचारिक दुफळी कारणीभूत असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.
‘लष्करी कारवायांपेक्षा जनाधार मिळवणे महत्त्वाचे आहे,’ या भूपतीच्या भूमिकेमुळेच संघटनेत दोन गट पडले होते, अशी कबुली खुद्द भूपतीनेच विविध गुप्तचर यंत्रणांच्या चौकशीत दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
मागील आठवड्यात, १५ ऑक्टोबर रोजी, वरिष्ठ नक्षल नेता भूपती (सोनू) याने आपल्या ६० सशस्त्र सहकाऱ्यांसह गडचिरोली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत तोच, छत्तीसगडमधील जगदलपूर येथे भूपतीचा जवळचा सहकारी आणि केंद्रीय समितीचा सदस्य आशन्ना (रुपेश/सतीश) याने तब्बल २०८ सहकाऱ्यांसह शस्त्रे खाली ठेवली. या दोन मोठ्या घटनांनंतर देशातील विविध गुप्तचर यंत्रणांनी या दोन्ही बड्या नेत्यांची कसून चौकशी सुरू केली आहे.
२०११ मध्येच पडली फुटीची ठिणगी
गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भूपतीने चौकशीदरम्यान चळवळीतील अनेक अंतर्गत बाबींचा उलगडा केला आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, २०११ साली झालेल्या वरिष्ठ नक्षल नेत्यांच्या एका बैठकीत त्याने संघटनेची रणनीती बदलण्याची सूचना केली होती. भविष्यातील धोका ओळखून लष्करी कारवाया कमी करून अधिकाधिक लोकांचे समर्थन (जनाधार) मिळवण्यावर त्याने भर दिला होता. मात्र, संघटनेतील एक मोठा गट आक्रमक लष्करी कारवायांच्याच बाजूने होता. तेव्हापासूनच संघटनेत वैचारिक दुफळी निर्माण झाली होती. पुढे २०१४ साली देशात भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर नक्षलविरोधी कारवायांना प्रचंड गती मिळाली. यामुळे नक्षलवाद्यांचे मोठे नुकसान झाले.
फेब्रुवारी २०२४ ची बैठक ठरली निर्णायक
याच काळात भूपतीकडे काही काळ ओडिशा राज्याची जबाबदारीही देण्यात आली होती. सूत्रांनुसार, फेब्रुवारी २०२४ मध्ये, गडचिरोली सीमेला लागून असलेल्या अबूजमाड येथील गटकल भागात वरिष्ठ नक्षल नेत्यांची बैठक झाली. यात गणपती, मिशीर बेसरा, कट्टा रामचंद्र रेड्डी, बसवराजू आणि भूपती या केंद्रीय समिती सदस्यांचा समावेश होता. या बैठकीत वर्तमान परिस्थिती लक्षात घेता चळवळीची रणनीती बदलण्यावर सर्वांचे एकमत झाले. याच दरम्यान भूपतीने पत्नी जहाल महिला नक्षल नेता तारक्का हिला भेटून आत्मसर्पणाची सूचना दिली. त्यानुसार १ जानेवारीला तारक्काने मुख्यमंत्र्यांसमोर शस्त्र खाली ठेवले होते.
शांतता चर्चेचा प्रस्ताव फेटाळला
या बैठकीचा तपशील आणि वरिष्ठांचा संदेश हिडमा व देवजीकडे पोहोचवण्यासाठी व्यंकटेश नावाच्या सहकाऱ्याला दक्षिण बस्तरमध्ये पाठवले, मात्र तो एका चकमकीत मारला गेला. याच दरम्यान, संघटनेकडून पत्रके काढून सरकारला शस्त्रसंधी, युद्धबंदी आणि शांतता चर्चेची विनंती करण्यात आली. मात्र, सरकारने आत्मसमर्पणावरच ठाम राहत हा प्रस्ताव फेटाळला. प्रस्ताव फेटाळल्यानंतर काही महिन्यांतच महासचिव बसवराजू आणि केंद्रीय समिती सदस्य कट्टा रामचंद्र रेड्डी हे दोघेही वेगवेगळ्या चकमकींत ठार झाले. संघटनेचे सर्वोच्च नेतृत्वच संपल्याने आणि रणनीती बदलण्यास अपयश आल्याने अखेर भूपती आणि रुपेश यांनी आत्मसमर्पणाचा निर्णय पक्का केला. त्यांच्यासोबत आणखी एक केंद्रीय समिती सदस्यही शरण येणार होता, मात्र ऐनवेळी त्याने नकार दिला. काही दिवसांपूर्वी नक्षल कमांडर प्रभाकर आपल्या ठार करणार होता. असेही भूपतीने सांगितले आहे. या दोघांच्या शरणागतीनंतर नक्षल संघटनेने पत्रक काढून दोघांनाही ‘गद्दार’ ठरवत जीवे मारण्याची धमकी देत आगपाखड केली आहे.
देवजी, हिडमाचा करेगुट्टा टेकडी परिसरात ठिय्या
छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवर असलेल्या करेगुट्टा टेकडी परिसरात वरिष्ठ नक्षल नेता देवजी आणि बटालियन क्रमांक १ चा कुख्यात कमांडर हिडमा आपल्या तुकडीसह तळ ठोकून असल्याची माहितीही भूपतीच्या चौकशीतून समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी सुरक्षा दलांनी याच परिसरात केलेल्या कारवाईत ३० हून अधिक नक्षलवादी ठार झाले होते, मात्र हिडमा आणि देवजी निसटले होते. त्यामुळे दक्षिण बस्तरला लागून असलेला हा संवेदनशील परिसर आता सुरक्षा दलांच्या ‘रडार’वर आला आहे.