नियम डावलून विद्यापीठात कार्यक्रम

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागातील सहकारी  प्राध्यापिकेच्या मानसिक छळाची गंभीर तक्रार व अन्य वादग्रस्त प्रकरणांमुळे कायम चर्चेत असलेले विभागप्रमुख डॉ. निर्मलकुमार सिंग यांचा कार्यगौरव सोहळा आज बुधवारी विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरात घेण्यात

आल्याने शैक्षणिक वर्तुळातून प्रखर टीका होत आहे. विशेष म्हणजे, माजी कुलगुरू डॉ. काणेंच्या काळात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा केवळ विद्यापीठच घेईल, असा निर्णय झाला असतानाही त्याला बगल देत खुद्द प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

कार्यगौरव आणि सत्कार समारोह समिती नागपूर व मानव्यशास्त्र विद्या शाखेच्या वतीने बुधवारी मानव्यशास्त्र विभागामध्ये हा कार्यक्रम झाला. पत्रिकेतील मजकुरानुसार कार्यगौरवमूर्ती डॉ. निर्मलकुमार सिंग हे ३० ऑगस्टला सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या आजवरच्या सेवेचा गौरव करण्यासाठी आणि नवनियुक्त अधिष्ठाता व कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांचा सत्कार करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम पत्रिकेत कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचेही नाव होते मात्र ते आले नाहीत. कार्यक्रमाला शिक्षण मंचाच्या प्रमुख डॉ. कल्पना पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. निर्मलकुमार सिंग यांच्या मनमानी कारभारामुळे येथील प्राध्यापक त्रस्त आहेत. याच विभागातील प्राध्यापिका डॉ. सुप्रिया डेव्हिड यांनी डॉ. सिंग यांच्याविरोधात माजी कुलगुरू डॉ. काणे यांच्याकडे मानसिक छळाची गंभीर तक्रार केली होती. डॉ. काणे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

विद्यापीठाची प्रतिमा जपण्यासाठी हे प्रकरण महिला सेलकडे न पाठवता त्यांच्याच पातळीवर निस्तरले होते. डॉ. सिंग यांची कुलगुरू डॉ. चौधरी यांनी अधिष्ठातापदी नियुक्ती केल्यावरही शैक्षणिक वर्तुळातून टीका झाली होती. अशा अनेक तक्रारी असतानाही आज डॉ. सिंग यांचा कार्यगौरव सत्कार करण्यात आल्याने शैक्षणिक वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कुलसचिवांनी परवानगी कशी दिली?

दोन वर्षांआधी विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सत्कारासाठी दीक्षांत सभागृह नाकारल्याने  मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे यापुढे कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्ती सत्कार दीक्षांत सभागृहात करण्यात येतील असा निर्णय डॉ. काणे यांनी घेतला होता. शिवाय विद्यापीठाच्या परिसरामध्ये गौरव सोहळा आयोजित करण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. त्यामुळे कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी नियम डावलून कार्यक्रमाला परवानगी दिली कशी, असा सवालही उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी कुलसचिवांना संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

श्रद्धांजली सभेला फाटा, कार्यगौरव मात्र जोरात

रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांचे दोन दिवसांआधीच निधन झाले. जागतिक कीर्तीच्या डॉ. मेश्राम यांच्या निधनानंतर विद्यापीठात साधी श्रद्धांजली सभाही घेतली गेली नाही. उलट ही दु:खद घटना नुकतीच घडली असतानाही असा नियमब्ह्या’ कार्यगौरव सोहळा विद्यापीठ परिसरात आयोजित झाल्याने विद्यापीठाच्या धोरणावर टीका होत आहे.