नागपूर : दिवाळीनिमित्त सध्या शहरातील विविध बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची लगबग वाढली आहे. सायंकाळी रस्त्यांवर वाहनांची गर्दी होत असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. विशेष म्हणजे, बाजारपेठांमध्ये अतिक्रमण वाढल्यामुळे वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दिवाळीच्या खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत आहेत. शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची चांगलीच गर्दी दिसत आहे. विशेष म्हणजे, सायंकाळी बाजारपेठांमध्ये वाहनांची गर्दी होते. बहुतांश ठिकाणच्या रस्त्यांवर छोटय़ा विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. अशात सायंकाळी वाहने बाजारपेठांमध्ये येतात आणि पार्किंगसाठी जागा मिळत नसल्याने वाहनचालकांना मोठय़ा समस्येचा सामना करावा लागत आहे. छोटय़ा विक्रेत्यांचे अतिक्रमण व ग्राहक तसेच लोकांची गर्दी यामुळे सीताबर्डीच्या मुख्य रस्त्यांवर तर चालणेही अवघड  झाले आहे. येथील प्रत्येक दुकानाबाहेर हॉकर्स दुकाने लावली आहे. धरमपेठच्या लक्ष्मीभूवन चौकात गोकुळपेठ मार्केटआहे. या चौकातून रामनगरकडे जाणाऱ्या मार्गावर फळ, हार विक्रेत्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. दिवाळीनिमित्त इतरही दिवे, पणत्यांचे विक्रेते, इतर वस्तूंच्या हातगाडय़ा, पूजेच्या साहित्याचे विक्रेते रस्त्यावर बसत आहेत. यामुळे सायंकाळी तेथे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशीच स्थिती महालच्या बडकस चौकातील आहे. येथे चारही दिशेने बाजारपेठ असून वाहने रस्त्यांवर ठेवावी लागतात. परिणामी वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होते. त्याशिवाय गांधीबागमध्ये होलसेल मार्केटअसून तेथेही मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण केल्याने वाहनतळाची समस्या असल्याने नेहमीच वाहतूक कोंडी होते. इतवारी बाजारात सिमेंट रस्त्यांचे काम सुरू आहे. तेथेही फळविक्रेते रस्त्यावर हातगाडय़ा घेऊन उभे राहत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्याशिवाय सदर, सराफा बाजार, सक्करदरासह शहराच्या इतर ठिकाणच्या बाजारपेठांतील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, महापालिका  रस्त्यावरील हातगाडीचालकांवर आणि अतिक्रमण करून दुकाने थाटणाऱ्या छोटय़ा विक्रेत्यांवर कोणतीच कारवाई करताना दिसत नाही.