वनविभागाच्या निष्काळजीपणाचा भरुदड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशभरातून अस्तंगत होत चाललेल्या वाघांना वाचविण्यासाठी दूरचित्रवाणीवरील जाहिरातींपासून ते वनपर्यटन क्षेत्रांवरील जनजागृतीपर्यंत कित्येक उपाययोजना राबविण्यात आल्या. व्याघ्रकेंद्रित पर्यटनावर वनखात्याने कोटय़वधी रुपये कमावले. मात्र वाघांची चिंताजनक घटती संख्या रोखण्यात थोडेही यश येत नसल्याचे दर आठवडय़ाला होणाऱ्या वाघांच्या मृत्यूंवरून दिसून येत आहे. अवघ्या ४८ तासांत सात वाघ गमावण्याची नामुष्की राज्यावर ओढवल्यामुळे वाघांची संख्या कशी वाढणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. निधी असूनही बेफिकिरी आणि निष्काळजीपणाच्या कारणांमुळे वनविभागाला वाघ सांभाळता येत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या कोलितमाराजवळ पेंच नदीत २४ फेब्रुवारीला एक वाघ मृतावस्थेत आढळला. या वाघाचा मृत्यू होऊन तीन दिवस झाले होते. तरीही प्रशासनाला वाघाचा मृत्यू तीन दिवसांनी लक्षात आला. त्याच्या पायाला जखम असल्याने मगरीच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तवला. मात्र, तीन दिवसांनी वाघाचा मृत्यू उघडकीस आल्याने वनखाते व्याघ्र संवर्धन व संवर्धनाविषयी गांभीर्य आहे का, यावर प्रश्नचिन्ह आहे. या वाघावर अंत्यसंस्कार होत नाही तोच २५ फेब्रुवारीला चिमूर वनपरिक्षेत्रातील भान्सुली वन बीटमध्ये एका वाघाचा उपचाराअभावी मृत्यू झाला.  या दोन वाघांच्या मृत्युची चर्चा होत असतानाच गोरेवाडय़ातील वन्यप्राणी बचाव केंद्रात एका वाघिणीने तीचे चार पिल्ले गमावले. ‘ली’ नावाच्या या वाघिणीला ‘साहेबराव’ या वाघापासून पिल्लं झाली होती.  प्राणिसंग्रहालयातील वाघिणीचे पिल्ले सांभाळ करण्याची पद्धत वेगळी असते. मात्र, गोरेवाडा प्रशासनाला ही बाब समजली नाही आणि अवघ्या २४ तासात वाघिणीच्या सुदृढ  पिलांचा जीव गेला. वाघीण पिल्लांना जन्म देणार आहे ही बाब ठाऊक असताना सुद्धा तज्ज्ञांची मदत घेण्याची तत्परता प्रशासनाने दाखवली नाही. दरम्यान, २६ फेब्रुवारीला ब्रम्हपुरी वनविभागाच्या तळोधी  वनपरिक्षेत्रातील गंगासागर हेटी बिटात आळलेल्या दोन महिन्याच्या वाघाच्या बछडय़ाचा रविवारी चंद्रपूर येथील वन्यजीव उपचार केंद्रात मृत्यू झाला. आईपासून या बछडय़ाला नागपूर येथे उपचारासाठी आणण्यात येणार होते, पण याठिकाणीसुद्धा निर्णय घेण्यास वनखात्याने दिरंगाई केली आणि बछडय़ाचा मृत्यू ओढवला.

झाले काय?

शनिवारी एका वाघाचा मृतदेह पेंच नदीत सापडला. मगरीच्या हल्ल्यामध्ये हा मृत्यू झाल्याचा अंदाज वनखात्याने वर्तवला. तीन दिवस या वाघाच्या मृत्यूची कल्पना विभागाला नव्हती. रविवारी एका जखमी वाघाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. गोरेवाडी बचाव केंद्रात एका वाघिणीने जन्म दिलेल्या चार बछडय़ांचा सांभाळण्यातील निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला. तर एका जखमी बछडय़ाचा चंद्रपूर वन्यजीव केंद्रात निर्णयातील दिरंगाईमुळे मृत्यू झाला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven tigers die in pench tiger reserve in just 48 hours
First published on: 27-02-2018 at 03:01 IST