भंडारा : राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यातील दोषींचे अटकसत्र सुरूच आहे. गुरुवारी या प्रकरणात भंडारा जिल्ह्यातून तिघांना अटक करण्यात आली. सध्या अटकेत असलेल्या बोगस शिक्षकाच्या घरी सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे या तिघांना ताब्यात घेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार बोगस शालार्थ आयडी बनवून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याच्या प्रकरणात सुरुवातीला भंडारा जिल्ह्यातील बोगस शिक्षक महेंद्र महेशकर याला अटक करण्यात आली. यानंतर पोलिसांनी महेशकरच्या घराची झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडे विविध शाळातील शिक्षण सचिव, संस्थाचालक, शिक्षकांच्या बनावट कागदपत्रे सापडले होते. यामध्ये भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्यातील विनोद हायस्कूल शाळेतील शिक्षकांच्या नियुक्तीसंबंधी कागदपत्रांचाही समावेश होता. या आधारावर पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक चेतक डोंगरे, तत्कालीन सचिव गंगाधर डोंगरे व शिक्षक सदानंद कोठीराम जांगडे यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलाविले होते. चौकशीदरम्यानच त्यांना ताब्यात घेण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्रवारी या सर्वांना न्यायालयासमोर सादर केले जाणार आहे. सदर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात चार आजी-माजी शिक्षण उपसंचालकांसह आठ कर्मचारी व चार शाळा संचालकांसह १८ लोकांना अटक करण्यात आली आहे.