प्रशांत देशमुख, लोकसत्ता

वर्धा : शरद पवार राजकीय गोटी फिरविण्यात माहिर असल्याचे राजकीय वर्तुळात नेहमी बोलले जाते. त्याचा प्रत्यय आज अनेकांना आला. वर्धा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेला. तेव्हा पक्षातील प्रमुख तसेच अनेकजण पवारांना भेटून आले.

पक्षाकडे पैसे नाहीत, तू किती लावू शकतो ते बोल असे निर्वाणीचे स्वर ऐकून अनेकांनी मान खाली केल्या. मात्र, आता हेच आता भाव खाऊन जात असल्याचे चित्र आहे. कारण काँग्रसचे माजी आमदार अमर काळे यांची उमेदवारी पवार यांनी निश्चित केल्यावर हे इच्छुक नवा राग आळवित आहे. त्या पार्श्वभूमिवर पवार यांनी काळे यांना बोलावून घेतले. आज दुपारी चर्चा झाली. थोडे थांबा, असे काळे यांना सांगण्यात आले. तेव्हा वर्धा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस नेते नाराज आहेत. त्यांची भूमिका समजून घ्यावी लागेल. आम्हास एकदा विचारणा करणे अपेक्षित होते, असे नाराज नेते म्हणतात. त्यांच्याशी संवाद साधून उमेदवारी घोषणा करण्याचे ठरेल, असे पवार यांच्या कडून स्पष्ट करण्यात आले.

आणखी वाचा-“आमदार गायकवाड अर्ज भरणार हे मलाही ठाऊक नव्हते, आता सीएम साहेबच…”

त्याच वेळी लोकसत्तात उमटलेल्या ‘राष्ट्रवादीची उमेदवारी माझ्या अटीवर ‘ या बातमीचे कात्रण पवार यांच्याकडे पोहचल्याचे स्पष्ट झाले आणि इतर इच्छुकांची भावना काय, हे उजेडात आले. काळे हे आत्ताच माझ्या अटीवर, अशी भाषा बोलतात. पुढे पक्षाचे कसे होणार, अशी नाराज मंडळींची भावना असल्याचे काळे यांना कळले. या सर्व बाबीवर चर्चा झाली आणि भुकेची वेळ झाली म्हणून शरद पवार यांनी आणलेल्या जेवणाच्या डब्ब्यावर हात साफ करीत काळे शांत मनाने बैठकीतून बाहेर पडले.

उद्या, शुक्रवारी राष्ट्रवादी वर्धाचे सर्वेसर्वा प्रा. सुरेश देशमुख, बाजार समिती अध्यक्ष सुधीर कोठारी, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, माजी आमदार राजू तिमांडे, अतुल वांदिले व पक्ष स्थापनेपासून जुळलेले अन्य नेते यांच्या भावना शरद पवार हे जाणून घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. वर्धा लोकसभा मतदार संघातील उमेदवारीचा तीढा सर्वात शेवटी सुटणार, हे लोकसत्ताने प्रारंभीच नमूद केले होते, हे विशेष.