भंडारा : नवरात्रीनिमित्त पवनी येथे पवनी महोत्सवाचे आयोजन आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या कल्पनेतून करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांना आमंत्रित करण्यात आले. काल रात्री हा कार्यक्रम संपल्यानंतर आमदार नरेंद्र भोंडेकर आणि त्यांचे कार्यकर्ते मंचावर नाचत असताना अचानक स्टेज कोसळून आमदार भोंडेकर यांच्यासह त्यांचे कार्यकर्तेही धडाधड स्टेजच्या खाली पडले. काल रात्री सुमारे साडेअकरा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. यात घटनेत आमदार भोंडेकर सह कार्यकर्त्यांना किरकोळ दुखापत झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूम आहे. या निमित्य दुर्गा उत्सव मंडळ तसेच लोकप्रतिनिधींच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. विदर्भाची काशी असलेल्या पवनी येथे नवरात्र उत्सवानिमित्त भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पाच दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांच्या भव्य जागरणाचा कार्यक्रम २९ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आला होता. नवनिर्मिती दुर्गा उत्सव मंडळ पवनीच्या भव्य प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला.
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून २६ सप्टेंबर पासून पाच दिवसीय “विदर्भ काशी पवनी महोत्सव” सुरू करण्यात आला. पवनी येथे आयोजित या पाच दिवसीय महोत्सव दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, ज्यात मॅरथॉन, स्टँडिंग कॉमेडीचा बादशाह सुनील पाल व भजन गायक शहनाज अख्तर हे पवनी करीता आकर्षण ठरले. रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम चालला.
भंडारा : नवरात्रीनिमित्त पवनी येथे पवनी महोत्सवाचे आयोजन आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या कल्पनेतून करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांना आमंत्रित करण्यात आले. https://t.co/2jrmCKw8Ui#Navratri2025 pic.twitter.com/uE0DaxKGpd
— LoksattaLive (@LoksattaLive) September 30, 2025
कार्यक्रम संपल्यानंतर अंदाजे साडेअकरा वाजता दरम्यान आमदार भोंडेकर आणि त्यांचे कार्यकर्ते स्टेजवर डीजेच्या तालावर नाचू लागले. मात्र काही क्षणातच हा स्टेज खाली कोसळला आणि आमदार भोंडेकर यांच्यासह त्यांचे कार्यकर्तेही धडाधड खाली पडले. या घटनेत काही कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. काही वर्षांपूर्वी भंडारा येथे आमदार भोंडेकर यांच्या वतीने आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमात देखील एक स्तंभ कोसळल्याची घटना घडली होती. त्यावेळी देखील काही गोविंदा जखमी झाले होते हे उल्लेखनीय.
नरेंद्र भोंडेकर मित्र मंडळ, शिवसेना, युवा सेना तसेच महिला आघाडी द्वारे आयोजित या महोत्सव अंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले होते. पवनी येथील श्री चंडिका माता मंदिर येथे महाआरतीने महोत्सवाची सुरुवात झाली होती तर सोमवारी सायंकाळी सुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांची भजनसंधेने कार्यक्रमाचा समारोप झाला. मात्र या कार्यक्रमाच्या समारोपाला गालबोट लागले. दरम्यान, मंगळवारी आयोजित करण्यात आलेला विदर्भस्तरीय भव्य गरबा व दांडिया स्पर्धा काही तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात आलेले आहे अशा सूचना त्यांच्या वतीने देण्यात आले असल्याची माहिती आहे.