अकोला: शिवसेना शिंदे गटाने अकोला जिल्ह्यात काही नियुक्त केल्यामुळे पक्षांतर्गत प्रचंड असंतोष वाढला. आज हा वाद विकोपाला गेला आहे.
संपर्क प्रमुख गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात शिवसेनेतीलच पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन तीव्र रोष व्यक्त केला. त्यानंतर शिवसैनिकांनी गोपीकिशन बाजोरिया यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करून तो जाळून टाकला. संपर्कप्रमुख बदलण्याची मागणी नाराज शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
शिवसेना शिंदे गटांतर्गत प्रचंड वाद वाढले आहेत. संपर्कप्रमुख गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यातच विद्यमान जिल्हा प्रमुखांचे महत्त्व कमी करून काही महिन्यांपूर्वीच पक्षात आलेल्या नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे पक्षातील असंतोष आणखी उफाळून आला. संपर्कप्रमुख गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात पदाधिकाऱ्यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली.
जिल्हा परिषद भवनामध्ये गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये बाजोरिया यांच्या कार्यपद्धतीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला. बाजोरिया यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पक्षाच्या नावावर संपर्क प्रमुख स्वतःचा फायदा करून घेत असल्याचे काही पदाधिकारी म्हणाले. सरकारी निधीचा दुरुपयोग करून खासगी भूखंडांवर सुविधा निर्माण केल्या.
विधानसभा निवडणुकीत युती धर्म पाळण्याऐवजी काँग्रेस उमेदवार साजिद खान पठाण यांना मदत केल्याचे देखील पदाधिकारी म्हणाले आहेत. यावेळी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, अश्विन नवले, महानगर प्रमुख योगेश अग्रवाल, पप्पू मोरवाल, शिंदे गटाचे माजी नगरसेवक शशीकांत चोपडे, रमेश गायकवाड, राजू ठाकूर आदींसह अनेकांनी आपले विचार मांडून बाजोरिया यांच्या विरोधात पाढा वाचला. संतप्त पदाधिकारी व कार्यकर्ते गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधातील बैठकीनंतर नेहरु पार्क चौकात एकत्र आले.
बाजोरिया यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चप्पल मारून तो जाळला. यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या असंतुष्ट पदाधिकाऱ्यांनी गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून गोपीकिशन बाजोरिया यांना हटवण्यासाठी पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले.
अगोदरच शिवसेना शिंदे गटापुढे जिल्ह्यात अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये अनेक गट निर्माण झाले असून गटातटाचे राजकारण शिगेला पोहोचले. त्यातच बाहेरून आलेल्या नेत्यांना पदे वाटल्याने पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. शिवसेना शिंदे गटांतर्गत वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.