भंडारा : शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते आनंद दिघे यांच्याबद्दल प्रत्येकजण आदराने बोलतात. परंतु भाजपचे आमदार परिणय फुके यांनी पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात आपण शिवसेनेचा बाप असल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने शिवसेना कार्यकर्ते दुखावले आहेत. फुके यांनी १२ तासांच्या आत त्यांच्या विधानाबद्दल माफी मागावी, अन्यथा आम्ही शिवसेनाशैलीत त्यांना योग्य उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना (शिंदे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
भंडारा येथील विश्राम भवनात रविवारी याबाबत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेना लोकसभाप्रमुख संजय कुंभलकर म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेनेचे बाप आहेत. कुणीही बळजबरीने शिवसेनेचे अवैध बाप बनण्याचा प्रयत्न करू नये. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत फुके यांनी शिवसेनेचे उमेदवार डॉ. प्रकाश मालगावे यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस उमेदवाराला सहा मते देण्याचे षड्यंत्र रचले. त्यामुळे मालगावे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. फुके यांनी शिवसेनेबद्दल अपमानास्पद भाषा वापरून कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा नेत्याला आवरावे, अन्यथा शिवसेनेचा बाप कोण आहे, हे आम्ही सांगू, असा इशाराही कुंभलकर यांनी दिला.
पत्रपरिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल गायधने, उपप्रमुख सुरेश धुर्वे, जिल्हा उपप्रमुख विजय काटेखाये, दीपक गजभिये, प्रकाश मालगावे, मनोज साकुरे, देवराज बावनकर, बंडू हटवार उपस्थित होते.