मंगेश राऊत, लोकसत्ता

नागपूर : काँग्रेस नेते सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंतला शिवसेनेने मदतीचा ‘हात’देऊन आमदार केले. त्यामुळे अकरा वर्षांनंतर चतुर्वेदी कुटुंबात दुष्यंतच्या रूपात आमदारकी आली आहे. या नवीन घडामोडीमुळे राजकीय विजनवासात असलेल्या चतुर्वेदी कुटुंबाला नवसंजीवनी मिळणार आहे.

यवतमाळ येथून स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषद निवडणूक जिंकण्यापूर्वी दुष्यंत यांची स्वत:ची अशी राजकीय ओळख नव्हती.  माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र म्हणूनच त्यांना ओळखले जायचे. त्यांचे वडील व काँग्रेस नेते सतीश चतुर्वेदी यांनी दोन दशकाहून अधिक काळ नागपूरचे राजकारण गाजवले. मात्र २००९ मध्ये पूर्व नागपूर मतदारसंघातून त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचा राजकीय विजनवास सुरू झाला. या काळात सतीश यांच्याप्रमाणेच दुष्यंतही राजकीय पटलावर नव्हते. २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीत प्रदेशाध्यक्षांवर झालेल्या शाईफेक प्रकरणात काँग्रेसने सतीश चतुर्वेदी यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

उपराजधानीत काँग्रेसमध्ये अनेक नेत्यांचे गट आहेत. या गटांच्या राजकारणामध्ये सर्वात सक्रिय नितीन राऊत, विलास मुत्तेमवार यांचे गट आहेत. दरम्यान, सतीश चतुर्वेदी व अनिस अहमद गट केवळ नावालाच उरले होते. या परिस्थितीत काँग्रेसमध्ये राहून उपराजधानीच्या राजकारणात  दुष्यंत यांचे पुनर्वसन होणे, शक्यच नव्हते. त्यामुळे २३ जून २०१९ ला दुष्यंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. राज्यात झालेली विधानसभा निवडणूक चतुर्वेदी यांच्या पथ्यावर पडली व राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेतील विधानपरिषद आमदार तानाजी सावंत हे विधानसभेवर निवडून आले व त्यांनी परिषदेचा राजीनामा दिला. त्यामुळे यवतमाळ विधानपरिषदेच्या निवणुकीसाठी शिवसेनेने धनसंपन्न असलेल्या दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली. स्थानिक नेत्यांची नाराजी असतानाही शिवसेनेने दुष्यंत यांना निवडून आणले. मंगळवारी दुष्यंत यांच्या विजयासह  सतीश चतुर्वेदी यांच्या राजकारणाला नवसंजीवनी मिळाली. सध्या वडील काँग्रेसमध्ये आणि पुत्र शिवसेनेत अशी स्थिती असली तरी राज्यात या दोन्ही पक्षाच्या आघाडीचे सरकार असल्याने चतुर्वेदी कुटुंब  पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचा राजीनामा देणार का?

मुलाच्या पुनर्वसनासाठी राधाकृष्ण विखे पाटलांनी काँग्रेसला रामराम केला. आता उपराजधानीतही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मुलगा शिवसेनेचा आमदार म्हणून निवडून आला असून वडील सतीश चतुर्वेदी अजूनही काँग्रेसमध्ये आहेत. भविष्यात ते काँग्रेसचा राजीनामा देऊन घरावर कायमस्वरूपी भगवा फडकवणार का, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.