नागपूर: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उ. बा. ठा.) पक्षाकडून नागपुरात १८ ऑगस्टला राेजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी ३९ कंपन्यांकडून नागपुरातील तरुणांच्या मुलाखती घेतल्या जाईल. त्यानंतर कंपन्यांना पात्र उमेदवार मिळाल्यास त्यांना जागेवरच रोजगार मिळेल, अशी माहिती सोमवारी टिळक पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना उबाठा पक्षाचे महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे यांनी दिली.

उपराजधानीतील जगनाडे चौकातील हाॅटेल रिजेन्टामध्ये १८ ऑगस्टला दिवसभर चालणाऱ्या मेळाव्याला दुपारी ३ वाजता पक्षाचे नेते खासदार संजय राऊत आणि आमदार भास्कर जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार पक्षात ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारानुसार हा मेळावा असून तो पक्षातर्फे नागपुरात प्रथमच होत असल्याचेही मानमोडे यांनी सांगितले.

हेही वाचा – मुंबई : जाहिरात धोरणाचा पालिकेच्या कार्यालयांनाच विसर, पश्चिम दृतगती मार्गावर रस्त्याच्या मध्येच जाहिरातीचे फलक

मेळाव्यात नोकरीपूर्व समुपदेशनानुसार बँकिंग, विमा, रिटेल, टेक्सटाईल्ससह इतरही क्षेत्रांतील कंपन्यांचे प्रतिनिधी तरुणांना समुपदेशन देतील. यावेळी अभियंता, एक्झिक्युटिव्ह, बँकर, व्यवस्थापक, ग्राहक सेवा प्रतिनिधी, विक्री सहयोगी, तंत्रज्ञ यांसह इतरही पदांसाठी संबंधित कंपनीचे प्रतिनिधी मुलाखती घेतील. कंपन्यांच्या गरजेनुसार शैक्षणिक पात्रता असलेला उमेदवार उपलब्ध झाल्यास येथेच थेट नियुक्तीपत्र दिले जाईल. मेळाव्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या पन्नासावर विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव केला जाईल. सोबत गरजू विद्यार्थ्यांना सायकल आणि भ्रमणध्वनी संचाचे वाटपही केले जाईल. विदर्भातील तरुणांमध्ये अफाट क्षमता आहे. त्यांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात रुपांतरीत करण्यासाठी त्यांना या उपक्रमातून संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही याप्रसंगी मानमोडे म्हणाले. या उपक्रमानंतर येथील तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षणातून रोजगाराच्या इतरही संधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला पक्षाचे नेते दिपक कापसे, जयदीप पेंडके, मंगला गौर यांच्यासह इतरही नेते उपस्थित होते.

हेही वाचा – सलग सुट्टीच्या दिनी कोकणात धावणार विशेष रेल्वेगाडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेळाव्यात या कंपन्यांचा सहभाग

टाटा स्ट्राईव्ह, एक्सिस बँक, एलआयसी ऑफ इंडिया, पेटीएम, एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमी., बजाज ग्लोबल सर्व्हिसेस प्रा. लिमी., फ्लिपकार्ड सर्व्हिस प्रा. लिमी., मुथूट फायनान्स, इक्विटास स्माॅल फायनान्स बँक, निर्मल उज्वल क्रेडिट को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमी. (मल्टिस्टेट), इसाफ बँक, निर्मल उज्वल को- ऑपरेटिव्ह बँक, निर्मल टेक्सटाईल, कोंढाळी, ग्रामिण कुठा बँक, फस्ट लाईट कार्पोरेट, सक्षम ग्राम केडिट प्रा., पटेल इडुस्किल्स फाऊंडेशन, अर्बन मनी, श्रीजा ग्रुप, ग्लोबल बीआयएसएफ ॲकेडमी, वैभव इंटरप्रायझेस, करन कम्युनिकेशन, एक्सल मॅनेजमेंट कनसलटेंट, क्विज क्राॅप, यशस्वी ग्रुप, स्टार ह्युमन रिसोर्स, रानस्टॅन्ड.इन, कॅलीबर बिझनेस सपोर्ट, विंध्य ई-इंफोमिडिया प्रा. लिमी. आणि इतर.