बुलढाणा : जिल्ह्यातील हजारो नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्याच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करा अथवा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांसह घुसण्याचा रोखठोक ईशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा) ने दोन दिवसापूर्वीच दिला होता. त्याप्रमाणे गनिमी काव्याचा वापर करीत आक्रमक झालेल्या ठाकरे सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घुसण्याचा प्रयत्न केला. काही शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयच्या मुख्य प्रवेश द्वारावर चढून आत उडी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी व जलद कृती दलाने त्यांना आत जाण्यापासून रोखले. यावेळी घटना स्थळी तणावाचे वातावरण तयार झाले. शिवसैनिकांच्या गगनभेदी घोषणानी वातावरण आणखी तापले. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सामोपचाराची भूमिका घेत शिष्ट मंडळाला पालकमंत्री मकरंद पाटील यांची भेट घेण्याची तयारी दर्शविली. यामुळे ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी संयमी भूमिका घेत पोलिसांची शिष्टाई व मागणी मान्य केली. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील तणावं निवळला.

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आज शुक्रवारी, २६ सप्टेंबर रोजी दुपारी पालकमंत्री मकरंद आबा पाटील, सहपालकमंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली . जिल्ह्यातील जवळपास सर्वच लोकप्रतिनिधी आणि विविध प्रशासकीय विभागाचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते . दरम्यान आज दुपारी उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत घुसण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर चढून शिवसैनिक आत घुसण्याचा प्रयत्न केला. बुलढाणा विधानसभा संघटक सुनील घाटे हे लोखंडी गेटवर चढले.मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. तसेच ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, गजानन वाघ राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके, जिल्हा समन्वयक संदिपदादा शेळके यांची मनधरणी केली. यामुळे डीपीडीसी बैठकीत घुसण्याचा निर्णय ठाकरे सेनेने मागे घेतला.

यानंतर एका शिष्टमंडळाने राज्याचे मदत, पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा, अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या यासह विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. यावेळी पालक मंत्र्यांनी या मागण्यावर कारवाईचे आश्वासन दिले. युती शासन शेतकऱ्यान्च्या पाठीशी असून त्यांना सर्वतोपारी मदत देण्याची ग्वाही ना. पाटील यांनी दिली.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांच्या नेतृत्वात शिवसैनिक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमले होते. आंदोलनाच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणाव निर्माण झाला होता. शिष्टमंडळं बाहेर येईपर्यंत मुख्य द्वार बंद ठेवण्यात आले. कोणत्याही नेत्याला वा नागरिकांना आत जाऊ देण्यात आले नाही.