भंडारा : शुक्रवारी झालेला शिवशाही बसचा भीषण अपघात हा भंडारा जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वांत मोठा अपघात ठरला. या अपघातात कुणी आईवडील, कुणी सून तर कुणी मुलगी गमावली. मात्र जिल्ह्यातील एक गृहस्थाची बस चुकली आणि त्यांनी शिवशाही बसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा हा निर्णय त्यांच्यासाठी काळ ठरला.

साकोली तालुक्यातील कुंभली येथील प्रकाश हेमने यांची परिस्थिती बेताची असल्याने ते रायपूर येथे मुलासह कंपनीत कामासाठी राहतात. लेकीचे सासर कुंभली येथे आहे. विवाहित मुलीच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे ते आठ दिवसांपूर्वी रायपूरवरून कुंभली येथे आले होते. गुरुवारी ते परत रायपूरला जाणार होते. परंतु, त्यांची नागपूर-रायपूर ही बस साकोली येथे चुकल्यामुळे ते परत घरी गेले. मुलांचा फोन आल्यामुळे शुक्रवारी परत ते नागपूर-गोंदिया या शिवशाही बसने गोंदियाला जायला निघाले होते. गोंदियावरून रेल्वेने रायपूरला जाणार होते. तेथे रेल्वे स्टेशनवर त्यांचा मुलगा त्यांना घेण्यासाठी येणार होता. मात्र काळाने घात केला आणि हमने यांचा या अपघातात मृत्यू झाला.

हेही वाचा : कोण आहे ‘मतदारांच्या मनातील आमदार’…साकोलीतील फलकाची जोरदार चर्चा

भंडाऱ्याहून गोंदियाकडे जाणाऱ्या

शिवशाही बसच्या भीषण अपघातात शुक्रवारी ११ प्रवासी ठार झाले. घटनेनंतर प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अपघातग्रस्त बसची पाहणी करून चौकशी केली. कोहमारा ते डव्वा रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बस भरधाव वेगात असल्याचे समोर आले. चालकाचे एका दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात बसवरून नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला उलटली. सुमारे वीस फूट अंतर घासत गेली. रस्त्याच्या कडेची लोखंडी रेलिंगही तुटली. चालकाने चक्क ३५ मिनिटांत दोन थांबे घेत ३० किमी अंतर कापले असल्याचे माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे.

घटनेनंतर पोलीस, एसटी महामंडळाचे अधिकारी, प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत बसचे प्रवासी आणि प्रत्यक्षदर्शीकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. सर्वच यंत्रणांकडून चौकशी करण्यात आली. यात प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बसची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात बस फारच वेगात असल्याचे समोर आले. ओव्हरटेकच्या नादात ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.

हेही वाचा : शिवशाही बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती; चालकाने या पूर्वी ५ वेळा …

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा ते गोंदिया हा वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावर वाहने नेहमी सुसाट धावतात. वेगावर नियंत्रण नसते. कोहमारा ते मुंडीपारपर्यंत रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे किमान या ठिकाणी तरी वेग कमी असायला हवा. परंतु, चालक बेभान होऊन या मार्गावरून वाहने सुसाट पळवत असतात. परिणामी, लहान-मोठ्या घटना नेहमीच या मार्गावर घडतात. चालकांचा वाहन चालविण्याचा वेगच प्रवासी आणि सर्वसामान्यांच्या जीवावर उठला आहे. प्रशासकीय यंत्रणाही वाहनचालकांच्या मुसक्या आवळण्यात सपशेल अयशस्वी ठरली आहे. असेच वारंवार घडणाऱ्या घटनांवरून दिसून येते.