गडचिरोली : नक्षलवादाने ग्रस्त आणि भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीतील एक मोठा अडथळा आता दूर होणार आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना अखंडित वीजपुरवठा मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून आणि ‘रोझी ब्लू फाउंडेशन’च्या संचालिका व अंबानी उद्योगसमूहातील सदस्या श्लोका अंबानी यांच्या सामाजिक सहभागातून ‘सोलर शाळा’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणाचे दरवाजे उघडणार आहेत.
‘रोझी ब्लू फाउंडेशन’ आणि त्यांच्या ‘कनेक्ट फॉर’ या स्वयंसेवा प्लॅटफॉर्मच्या सामाजिक कार्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. ‘कनेक्ट फॉर’च्या संस्थापक श्लोका अंबानी आणि सह-संस्थापक मानिती शाह यांनी नीती आयोगाने ‘आकांक्षित जिल्हा’ म्हणून घोषित केलेल्या गडचिरोलीवर विशेष लक्ष केंद्रित करावे, अशी सूचना स्वतः मुख्यमंत्र्यांनीच केली होती. या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत अंबानी यांनी गडचिरोलीतील शैक्षणिक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी घेतलेला पुढाकार अत्यंत प्रशंसनीय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग दुर्गम असून अनेकदा पारंपरिक वीजपुरवठ्यात खंड पडतो. याचा थेट परिणाम शाळांमधील संगणक शिक्षण आणि आधुनिक अध्यापन पद्धतींवर होत होता. हीच अडचण ओळखून मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर जिल्हा प्रशासनाने वेगाने पावले उचलली. गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी ३१ ऑक्टोबर रोजी ‘सोलर शाळा प्रकल्पा’अंतर्गत रोझी ब्लू फाऊंडेशनला काम करण्यास रीतसर मंजुरी दिली. या प्रकल्पाला जिल्हा प्रशासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
या मंजुरीनंतर फाऊंडेशनने पहिल्या टप्प्यात धानोरा या नक्षलग्रस्त व अतिदुर्गम तालुक्यातील दहा जिल्हा परिषद शाळांची निवड केली आहे. या शाळांमध्ये सौरऊर्जेवर आधारित युनिट्स बसवण्याचा उपक्रम तातडीने हाती घेण्यात आला. यामध्ये जि.प. प्राथमिक शाळा धानोरा, मुसक्या, सालेभट्टी, रांगी, निमगाव, दुडमला, मुरूमगाव, बन्धोना, तसेच जि.प. हायस्कूल धानोरा आणि मोहली या शाळांचा समावेश आहे.
या प्रकल्पामुळे या शाळांमधील सुमारे १,४७० विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ होणार आहे. सौरऊर्जेमुळे शाळांमधील अध्यापन, डिजिटल शैक्षणिक उपक्रम आणि संगणक प्रणालींसाठी अखंडित व विश्वासार्ह वीजपुरवठा उपलब्ध होईल. पारंपरिक वीजपुरवठ्यावरील अवलंबित्व संपुष्टात येऊन, दुर्गम भागातील विद्यार्थीही तंत्रज्ञानाशी जोडले जातील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि श्लोका अंबानी यांच्या संयुक्त सहकार्यातून सुरू झालेला हा ‘सोलर शाळा प्रकल्प’ गडचिरोली जिल्ह्यातील शाळांना नव संजीवनी देणारा ठरणारा, अशी अशा प्रशासकीय स्तरावर वर्तवण्यात येत आहे.
