नागपूर : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे सरोवर परिसरातील अनेक पुरातन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. वाढलेल्या पाणी पातळीमुळे सरोवराची जैवविविधता धोक्यात आली आहे. लोणार अभयारण्यातील वन्यप्राणी बाहेर पडण्यास सुरुवात झाली असून या ठिकाणी मानव-वन्यजीव संघर्ष उद्भवण्याचीदेखील शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी ‘युनेस्को’ने लोणार सरोवराला ‘जिओ हेरिटेज साइट’ म्हणून मान्यता दिली.

लोणार सरोवर हे सुमारे ५२ हजार वर्षांपूर्वी उल्कापातामुळे बेसॉल्ट खडकात निर्माण झालेले हे जगातील एकमेव सरोवर आहे. सरोवरातील पाणी अल्कधर्मीय असून पाण्यात सोडियम, क्लोराइड आणि सल्फेटसारख्या क्षारांचे प्रमाण अधिक आहे. सूक्ष्म जिवाणूंसाठी हे पाणी उत्तम आहे. मात्र, आता या पाण्याची ‘पीएच’ पातळीदेखील कमी झाल्यामुळे पाण्याचे गुणधर्म बदलत आहेत.

गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदा लोणार सरोवरातील पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे परिसरातील कमळजा माता मंदिर, गणेश मंदिर, रामगया मंदिर अशी अनेक मंदिरे पाण्याखाली आहेत. सरोवराच्या काठावर पापारेश्वरसारखे काही पाण्याचे पाच जिवंत झरे आहेत. ते पाणी आधी शेतीसाठी दिले जात होते. शेतातील विहिरीत पाणी जात होते. त्यामुळे सरोवराची पाण्याची पातळी स्थिर होती. आता ही शेतीही राहिली नाही आणि विहिरीदेखील बुजल्या आहेत. आता झऱ्यातून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढल्याने ते पाणी थेट सरोवरात जात आहे. परिणामी सरोवराच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पहिल्यांदाच या ठिकाणी माशांचे अस्तित्व आढळले.

वाढलेल्या पाण्यामुळे लोणार अभयारण्यातील बिबट, रानडुक्कर, कोल्हे यांसारखे प्राणी बाहेर येऊ लागले आहेत.

मानवी हस्तक्षेप कारणीभूत

लोणार शहरातील सांडपाणी मोठ्या प्रमाणात सरोवरात जात आहे. नीरीचा सांडपाणी प्रकल्पहीदेखील गुलदस्त्यात आहे. पर्यटकांना जाण्यासाठी लोणार सरोवराच्या काठावर रस्ता तयार करण्यात येत आहे. त्यासाठी लागणारे माती, मुरूम सरोवराच्या तळाशी जात आहे. वन विभागाने वृक्षारोपणासाठी सुबाभूळची झाडे काढून खड्डे खणले. त्यामुळे आतापर्यंत सुबाभूळच्या मुळांनी धरून ठेवलेती माती सरोवरात गेली. त्यामुळे सरोवराची खोली कमी झाली आहे आणि पाण्याच्या पातळीतदेखील वाढ झाली आहे.

सरोवरात येणारे सांडपाणी थांबवावे लागेल. लोणार तालुक्यात पाण्याचा दुष्काळ आहे. अशा वेळी सरोवर परिसरातील जिवंत झऱ्यातील पाणी नगरपालिकेच्या टाक्यांमध्ये सोडता येईल. यामुळे परिसरातील पाण्याचा दुष्काळ कमी होईल आणि सरोवरात जाणारे पाणीही रोखता येईल. मानवी हस्तक्षेप थांबवला तरीही सरोवराच्या संवर्धनाला बळकटी मिळेल.  – सचिन कापुरे, अभ्यासक, ‘मी लोणारकर’