अमरावती : कोणतीही निवडणूक आली की प्रबळ उमेदवाराच्‍या विरोधकांची पहिली तयारी असते, ती दमदार उमेदवाराच्‍या नामसाधर्म्‍याचे मतदार शोधून त्‍यांना निवडणूक रिंगणात उमेदवार म्‍हणून उतरविण्‍याची. अमरावती लोकसभा मतदार संघातही हा प्रकार घडला. काँग्रेसचे उमेदवार बळवंत बसवंत वानखडे यांच्‍याशी नामसाधर्म्‍य असणाऱ्या अपक्ष उमेदवाराचे पूर्ण नाव आहे, बळवंत हरीभाऊ वानखडे. त्‍यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. पण भाजपच्‍या कार्यकर्त्‍यांनी कर्ज मिळवून देण्‍याच्‍या नावाखाली अर्ज भरायला लावला होता, असा आरोप बळवंत हरीभाऊ वानखडे याने केल्‍याने या प्रकाराची चांगलीच चर्चा रंगली आहे.

आणखी एक बळवंत वानखडे रिंगणात आल्याने काँग्रेसच्या छावणीत चिंतेचे वातावरण होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचा शोध सुरू केला. तो सुरू असतानाच, या बळवंत वानखडे यांनी शनिवारी स्वत: कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी लावली आणि त्यांनी माघार घेतली, त्यात नावातील समानतेमुळे मतांचे विभाजन होण्याची शक्‍यता टळली आणि काँग्रेसच्या उमेदवाराला दिलासा मिळाला.

हेही वाचा…शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले “डॉक्टर नाही, पण काहींचे पट्टे सोडवले”

मला व्यवसायासाठी कर्ज देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु थेट जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांसमोर हजर झालो, जिथे माझा उमेदवारी अर्ज दाखल झाला, असे अपक्ष उमेदवार बळवंत हरीभाऊ वानखडे यांनी सांगितले.

हेही वाचा…भाजपच्या प्रचारात अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अनुपस्थिती चर्चा; मन वळविण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची मध्यस्थी

माताखिडकी परिसरातील रहिवासी असलेले बळवंत वानखडे यांनी माघार घेतल्यावर पत्रकारांना सांगितले की, काही दिवसांपूर्वी भाजपचे काही कार्यकर्ते त्यांच्याकडे आले आणि त्यांनी कर्जाची व्यवस्था करू असे सांगून त्यांची कागदपत्रे गोळा केली. त्यांनी मला जिल्हाधिकारी कार्यालयात नेले आणि काही कागदांवर माझ्या सह्या घेतल्या, काही पैसे दिले आणि निघून गेले. नंतर मला लोकांकडून समजले की मी लोकसभेचा उमेदवार आहे. मी घाबरलो आणि तीन दिवसांसाठी बाहेरगावी गेलो. मी शुक्रवारी परत आल्यानंतर प्रभाकर वळसे यांनी माझी फसवणूक झाल्याचे पटवून दिले. निवडणूक लढवणे हे माझे क्षेत्र नाही, हे लक्षात घेऊन मी माघार घेतली, असा खुलासा वानखडे यांनी केला. अमरावतीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात निकराची लढत आहे. महाविकास आघाडीच्‍या उमेदवाराच्या नावात साम्य असल्याने काही गोंधळ आणि मतांची विभागणी होऊ शकते, हे लक्षात आल्यावर मी माघार घेतली, असे ते म्हणाले.