नागपूर : नागपूरचा सीताबर्डी किल्ला नागपूर शहरातील पर्यटनाचे प्रमुख केंद्र झाले आहे. नागपूर बाहेरचे अनेक पर्यटक शहरात आल्यावर हा किल्ला बघण्याची इच्छा व्यक्त करतात. मात्र तो रोज  पर्यटकांसाठी खुला नसतो. आता पर्यटन विकास महामंडळाने महिन्यातून दोन वेळा सहली सुरू केल्याने नागपूरकरांसोबत बाहेरून येणाऱ्या पर्यटकांचीही सोय झाली आहे. या  किल्ल्याला इतिहास आहे. या निमित्ताने तो जाणून घेता येणार आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने शनिवारी सीताबर्डी किल्ला सहलीचे आयोजन केले होते. यात सहभागी पर्यटकांनी किल्ल्याचे ऐतिहासिक महात्म्य जाणून घेतले. सीताबर्डी किल्ल्यावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पादत्राणे व इतर साहित्य जतन करुन ठेवण्यात आले आहे. तेथे मोठे हौदही आहेत.

इंग्रजांच्या काळात काळ्यापाण्याची शिक्षा देण्याकरिता किल्ल्यावर अंधार कोठडीची जागा, युध्दाच्या वेळी शत्रूवर दारूगोळा हल्ला करण्याचे ठिकाण, किल्ल्याच्या संरक्षणाची स्थाने, इंग्रज अधिकाऱ्यांची स्मशानभूमी , पंचम जार्ज व राणी यांचे लोकांना संबोधित करण्याचे ठिकाण आदी बाबतची माहिती भारतीय सैन्यदलाचे गाईड अभिजीत कोल्हे यांनी पर्यटकांना दिली.

या सहलीमध्ये पर्यटन विभागाचे सुनील येताळकर, अधिकारी व कर्मचारी तसेच संरक्षणा खात्याचे अधिकारी ,मध्यवर्ती कारागृहातील अधिकारी, इतर विभागाचे अधिकारी यांनी सहभाग घेतला. महामंडळामार्फत प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी सीताबर्डी किल्ल्याची सहल आयोजित केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी(भा.प्र.से) यांनी दिली आहे. यापूर्वी सीताबर्डी किल्ला पाहण्याची संधी फक्त राष्ट्रीय सणाच्या दिवशीच असायची. तो जनतेसाठी इतर दिवशीही खुला करावा, अशी नागपूरकरांची मागणी होती. पर्यटन विकास महामंडळा आता तेथे दर महिन्याला दोन वेळा सहल आयोजित केल्याने नागपूरकरांना चालून आली आहे.