काँग्रेसचा पारंपरिक गढ अशी ओळख असलेल्या विदर्भाला कालांतराने भाजप-सेनेने सुरुंग लावला असला तरी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपासून तर या वर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांपर्यंत या पक्षाला मिळालेल्या मतांवर नजर टाकल्यास त्यात वाढ झाल्याचे दिसून येते.
विदर्भात विधानसभेच्या एकूण ६२ जागा आहेत. २०१४ मध्ये काँग्रेस पक्ष स्वबळावर लढला होता त्या वेळी या पक्षाला २३.७० लाख मते मिळाली होती. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्ष दहांपैकी सात जागेवर लढला. यात त्यांना २९.८५ लाख मते मिळाली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने ६२ पैकी ४७ जागा लढवून ३४.२७ लाख मते घेतली. पक्षाच्या जागाही १० वरून १५ झाल्या.
२०१४ ची विधानसभा, २०१९ ची लोकसभा आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा (ऑक्टोबर २०१९) निवडणुकीत लोकसभा मतदारसंघनिहाय मतांचा आढावा घेतल्यास काँग्रेसच्या मतांची संख्या वाढलेली दिसून येते.
नागपूर लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सहा मतदारसंघांत काँग्रेसला ३ लाख ३० हजार १३० मते मिळाली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ही संख्या ४.४४ लाखांवर गेली व या विधानसभा निवडणुकीत ४.६० लाख मते पक्षाला मिळाली. रामटेक लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांत २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला २.४९ लाख मते मिळाली होती. या निवडणुकीत पक्षाला ३.४३ लाख मते मिळाली. विशेष म्हणजे सहापैकी चारच जागा काँग्रेसने लढवल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ३,९१ लाख मते मिळाली होती.
बुलढाणा जिल्ह्य़ात २०१४ मध्ये ३.४० लाख मते मिळाली होती. लोकसभेत ही जागा राष्ट्रवादीकडे होती. त्यांच्या उमेदवाराला ३.८८ लाख मते मिळाली होती. आत्ताच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यापेक्षा अधिक म्हणजे ३.९२ लाख मते घेतली. वर्धा जिल्ह्य़ात २०१४ च्या निवडणुकीत १.८८ लाख, या निवडणुकीत चारपैकी तीन जागा लढवून २.२१ लाख मते घेतली.
वाशीम जिल्ह्य़ात २०१४च्या निवडणुकीत काँग्रेसला १,३७ लाख मते होती. २०१९ च्या विधानसभेत ही संख्या १.४९ लाखांवर गेली. भंडारा-गोदिया लोकसभा क्षेत्रातील सर्व विधानसभा मतदारसंघांत २०१४ मध्ये काँग्रेसला एकूण २.६२ लाख मते होती. २०१९ मध्ये ही संख्या ४.३० लाखांवर गेली. गडचिरोली-चिमूरमध्ये २०१४ मध्ये काँग्रेसला ६९,१४१ मते होती. २०१९ च्या वि.स. निवडणुकीत ही संख्या वाढून १.५८ लाखांवर गेली. चंद्रपूर-वणी लोकसभा क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये ३,५१
लाख मते काँग्रेसने घेतली होती. २०१९ च्या निवडणुकीत ही संख्या ४.३३ लाखांवर गेली. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने २.३६ लाख मते घेतली होती. या वेळी ही संख्या ३.१३ लाखांवर गेली. लोकसभा निवडणुकीत पक्षाने ४.२४ लाख मते घेतली होती.
अमरावती जिल्ह्य़ात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ३.४० लाख मते होती. लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे होती. त्यांना या निवडणुकीत ५.१० लाख मते मिळाली. विधानसभा निवडणुकीत पक्षाने जिल्ह्य़ातील दोन जागा मित्रपक्षाला सोडल्या होत्या.
अकोला जिल्ह्य़ात मात्र वंचितच्या उमेदवारांनी मोठय़ा संख्येने मते घेतल्याने येथे काँग्रेसला फटका बसला. या जिल्ह्य़ात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला २.४१ लाख मते मिळाली होती. लोकसभेच्या निवडणुकीत त्यात वाढ होऊन ती २.५३ लाख झाली होती. मात्र या निवडणुकीत ती कमी होऊन १.४८ लाखांवर आली.