अमरावती : कडक सुरक्षा आणि यंत्रणा दक्ष असल्याचा दावा करणाऱ्या अमरावती मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडे वारंवार मोबाईल फोन सापडत असल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या चार दिवसांत कैद्यांकडून तब्बल सहा अँड्रॉइड मोबाईल जप्त करण्यात आल्याने कारागृहाच्या कार्यप्रणालीवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

रविवारी दोन कैद्यांजवळ मोबाईल व बॅटऱ्या मिळाल्यानंतर, मंगळवारी पुन्हा दोन अँड्रॉइड मोबाईल जप्त झाले होते. या गंभीर घटनेनंतर कारागृह सुरक्षा पथकाचे अध्यक्ष पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्यासह राज्य गुप्त वार्ता आणि एटीएसच्या पथकाने बुधवारी सकाळपासून दुपारपर्यंत संपूर्ण कारागृहाची संयुक्तपणे पाहणी केली. संशयित बंदी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आली.

पोलीस आयुक्त चावरिया यांनी तत्काळ जप्त केलेले मोबाईल गुन्हे शाखेच्या पथकाकडे तपासासाठी सोपवले. दरम्यान, सहा क्रमांकाच्या बराकीमागे पुन्हा एक मोबाईल सापडल्याने प्रशासन हादरून गेले.

सहा मोबाईल, चौकशीची गती वाढली

जप्त केलेल्या मोबाईलची संख्या आता सहा झाली आहे. अलीकडेच अंडा सेलमध्ये कैदी परवेझ दशवेझ खान आणि दस्तगीर गफूर शाह यांच्याकडून तीन मोबाईल जप्त झाले होते. त्यानंतर पुण्याच्या एका कैद्याकडून दोन मोबाईल आणि गुरूवारी बॅरेकजवळ सापडलेला मोबाईल, असे एकूण सहा मोबाईल गेल्या चार दिवसांत जप्त झाले आहेत.

पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी या गंभीर प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे प्रमुख पीआय संदीप चव्हाण यांच्याकडे सोपवला आहे. जप्त केलेल्या मोबाईलचा सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) डाटा काढण्यासाठी ते सायबर सेलकडे पाठवले आहेत. मुख्य प्रवेशद्वारापासून ते अंडा सेलपर्यंत तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचारी, तसेच अंडा सेलमध्ये जेवण पुरवणारे आणि लॉन्ड्रीवाल्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. कैदी मोबाईल कुठे चार्ज करत होते, याचाही तपास होणार आहे. काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा बॅकअपही जप्त केला जाणार आहे. अनेक कैदी व्हिडिओ कॉलद्वारे तुरुंगाबाहेरील लोकांशी संवाद साधत होते. ही कृती बऱ्याच काळापासून सुरू असल्याचा संशय आहे.

बुधवारी कार्यक्षमता पथकाने तुरुंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले. त्यानंतर, गुरुवारी, पुण्याहून एक विशेष तपास पथक या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आले आहे. तपास अहवाल पूर्ण झाल्यानंतर, दोषी तुरुंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याचे संकेत मिळाले आहेत. अमरावती कारागृहात वारंवार मोबाईल सापडणे हे सुरक्षा व्यवस्थेतील दुर्लक्ष आणि संभाव्य आर्थिक गैरव्यवहाराकडे बोट दाखवत आहे. गुन्हे शाखेच्या तपासानंतर या प्रकरणातील नेमके सत्य काय आहे, हे समोर येऊ शकेल.