यवतमाळ : मध्यप्रदेशातील २२ पेक्षा अधिक बालकांचा कप सिरपमुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच यवतमाळातही एका सहा वर्षीय बालकाचा सर्दी, खोकल्यावरील उपचारानंतर मृत्यू झाला. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, अन्न व औषध प्रशासन विभागाने औषधीचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. बालकाला सर्दी खोकल्याचा त्रास असल्याने पालकांनी स्थानिक वीर वामनराव चौकातील एका खासगी बाल रुग्णालयात आणले. ४ ऑक्टोबर रोजी प्रकृती दाखवून औषध घेऊन ते गावी परतले.
मात्र आराम न मिळाल्याने पुन्हा ६ ऑक्टोबरला पालकांनी त्याच दवाखान्यात आणले. डॉक्टरने औषधे बदलून दिली. नवीन औषधे घेऊन गावी गेल्यानंतर ७ ऑक्टोबरला त्याची कृती बिघडली. तो बेशुद्ध पडला आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. पालकांनी त्याला तातडीने पुन्हा त्याच बालरोग तज्ज्ञाकडे नेले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने खासगी दवाखान्यातील डॉक्टरने त्याच्यावर उपचार करण्यास नकार देऊन त्याला शासकीय रुणालयात रेफर केले. अपघात कक्षातील डॉक्टरांनी तपासले असता शिवमचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
संवेदनशील प्रकरण असल्याने बालकाचे शवविच्छेदन करण्यात आले. बालकाचा व्हिसेरा रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला, तर इतर अवयव हिट्रॉपथालॉजीकडे तपासणीला दिले आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मेडिकल प्रशासनाने याची माहिती सहायक आयुक्त औषधी यांना दिली. जिल्हाधिकारी, आरोग्य सचिव यांनाही माहिती देण्यात आली. त्यानंतर औषधी प्रशासनाच्या पथकाने खासगी बालरुग्णालय गाठले. तेथील मेडिकलमधून देण्यात आलेल्या सात औषधींचे नमुने घेतले. ही औषधी तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आली आहे.
शिवमचा मृत्यू सर्दी-खोकल्याचा औषधाने झाला की, यामागे आणखी दुसरे कारण आहे, याचा उलगडा शवचिकित्सा अहवाल आल्यानंतरच होणार आहे. शिवमला खासगी डॉक्टरने तीन दिवस दिलेल्या औषधीची गुणवत्ता काय होती, यावरूनही चौकशीची दिशा ठरणार आहे. त्यासाठी प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.
अहवालाची प्रतीक्षा
वैद्यकीय महाविद्यालयातून बालकाच्या मृत्यूनंतर पत्र प्राप्त झाल्यानंतर, यवतमाळच्या वीर वामनराव चौकातील तारक हॉस्पिटलमधील माई मेडिकलमधून कफ सिरप व इतर औषधांचे नमूने तपासणीसाठी ताब्यात घेतले. याबाबत प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच बालकाचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे स्पष्ट होईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त,मिलिंद काळेश्वरकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.