एकटय़ा गडचिरोली जिल्ह्य़ातून ५७२ नक्षलवादी मुख्य प्रवाहात
राज्य सरकार व पोलिसांच्या विशेष प्रयत्नाने १२ वर्षांत ५९१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात परतणे पसंत केले आहे. त्यापैकी सर्वाधिक ५७२ नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्य़ात आत्मसमर्पण केले.
अनेक नक्षलवादी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात परत येत आहेत. २००५ मध्ये राज्य सरकारने आत्मसमर्पण योजना सुरू केली. या योजने अंतर्गत नक्षलवाद्यांचे पुनर्वसन करण्यात येते. २००५ ते २०१७ या बारा वर्षांंच्या काळात गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर व यवतमाळ या जिल्ह्य़ातील ५९१ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यात १ दंडकारण्य स्पेशन झोनल कमेटी सदस्य, ६ डिव्हीजनल कमेटी सदस्य, २४ कमांडर, २७ उपकमांडर, २९४ दलम सदस्य, ११५ क्षेत्रीय, ग्रामरक्षक दल सदस्य, १२४ संगम सदस्य यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात ७७, दुसऱ्या टप्प्यात ६७, तिसऱ्यात ७५, चौथ्यामध्ये १३३, पाचव्यामध्ये ३०, सहाव्यात १५, सातव्या टप्प्यात २१, आठव्या टप्प्यात १२, नवव्या टप्प्यात ४७ आणि दहाव्या टप्प्यात ७५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.
आत्मसमर्पणासाठी जनजागृती
नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात परतण्यासाठी राज्य सरकारकडून आत्मसमर्पणाची योजना राबविण्यात येते. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलिसांकडून जनजागृती करण्यात येत असून त्याला चांगले यश मिळत आहे. आत्मसमर्पण करणाऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येते आणि त्यांच्या सुरक्षेसाठी गुप्तता बाळगण्यात येते. त्यांचे पुनर्वसन करण्यात येते.
– शरद शेलार, विशेष पोलीस महानिरीक्षक, नक्षलविरोधी अभियान.
टप्पे कालावधी आत्मसमर्पितांची संख्या
पहिला २९.०८.२००५-२८.०२.२००६ ७७
दुसरा ०१.०३.२००६-२८.०८.२००६ ६७
तिसरा २९.०८.२००६-२८.०८.२००७ ७५
चौथा २९.०८.२००७-२८.०८.२००८ १३३
पाचवा २९.०८.२००८-२८.०८.२००९ ३०
सहावा २९.०८.२००९-२८.०८.२०१० १५
सातवा २९.०८.२०१०-२८.०८.२०११ २१
आठवा २९.०८.२०११-२८.०८.२०१२ १२
नववा २९.०८.२०१२-२८.०८.२०१३ ४७
दहावा २९.०८.२०१३-२८.०८.२०१५ ७५
अकरावा २९.०८.२०१५-२८.०८.२०१७ ८९(मे२०१७ पर्यंत)