आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची स्थापना झाली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. परंतु, विविध पक्ष एकत्र आल्याने जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. कोण कुठून जागा लढवणार यावरून छुपे वाद सुरू आहेत. यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी टोला लगावला आहे. जागा वाटपाचा विषय गांभीर्याने घेण्यापेक्षा मोदींविरोधात लढा उभा करायला हवा, असं प्रकाश आबंडेकरांनी सुचवलं आहे.  वंचित बहुजन आघाडीतर्फे मनुस्मृती दिनानिमित्त सोमवारी नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर स्त्रीमुक्ती दिन परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.

“कोणी म्हणतंय मी २३ जागा लढेन, कोणी म्हणतंय अमुक जागा लढवेन. आम्ही त्यांना म्हणतोय पहिल्यांदा जागा सोडा. पक्ष वाढवायचा आहे की मोदी घालवायचा आहे?” असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला विचारला आहे.

हेही वाचा >> प्रकाश आंबेडकरांच्या सभेच्या व्यासपीठाचा मागचा भाग कोसळला; सभास्थळी धावपळ अन् गोंधळ…

“मोदी घालवायचा असेल तर २-४ जागा कमी आल्या तरी चालतील ही भूमिका असली पाहिजे. नाहीतर आम्हाला एवढ्याच जागा पाहिजेत, या भूमिकेवर राहिलात तर मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही. अन् तुम्ही तिहार जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही”, असा टोलाही त्यांनी लगावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सभेच्या व्यासपीठाचा मागचा भाग कोसळला

सोमवारी नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर बहुजन आघाडीतर्फे मनुस्मृती दिनानिमित्त स्त्रीमुक्ती दिन परिषद आयोजित केली. या परिषदेला अॅड. प्रकाश आंबेडकर, वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर आणि प्रदेश उपाध्यक्ष निशा शेंडे शहरात दाखल झाल्या होत्या. काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त २८ ला जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याने त्यापूर्वी वंचितने स्त्रीमुक्ती परिषद आयोजित करून शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कस्तूरचंद पार्कवर भव्य असे व्यासपीठ उभारण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून व्यासपीठाचे काम सलग सुरू होते. सोमवारी सकाळी व्यासपीठाचे उर्वरित काम पूर्ण झाले. व्यासपीठावर बाळासाहेब आंबेडकर यांचे आगमन होण्यापूर्वीच व्यासपीठाचा मागचा भाग (बॅकड्रॉप) लोखंडी अँगलसह कोसळला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. या घटनेमुळे एवढ्या मोठ्या मैदानात पळापळ झाली. या घटनेचे चित्रिकरण करण्यास गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधी आणि छायाचित्रकारांनी धाव घेतली असता काही कार्यकर्त्यांनी चित्रिकरण करण्यास मज्जाव केला. त्यानंतर काही वेळातच सुजात आंबेडकर यांनी व्यासपीठाच्या मागच्या बाजुला येऊन पाहणी केली. कोसळलेला भाग पूर्वरत करण्याच्या कामास सुरवात केली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा करीत वाद मिटविल्याची माहिती समोर आली आहे.