विदर्भात नवे चेहरे राजकारणात सक्रिय
नागपूर : सामाजिक चळवळीतून निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याच्या तयारीत असलेले काही ताज्या दमाचे चेहरे यावेळी विदर्भात मतदारांपुढे येणार आहेत. यात चंद्रपूरमध्ये दारूबंदीसाठी आंदोलन करणाऱ्या ‘श्रमिक एल्गार’च्या पारोमिता गोस्वामी, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात आदिवासींसाठी काम करणारे अॅड. लानसू नकोटी आणि मुख्याधिकारीपदाचा राजीनामा देऊन राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या माधुरी मडावी यांचा समावेश आहे.
पारोमिता गोस्वामी या ब्रह्मपुरी (चंद्रपूर) येथून आम आदमी पार्टीच्या उमेदवार आहेत, लानसू नकोटी अहेरी (गडचिरोली) मतदारसंघातून ग्रामसभेचे उमेदवार असणार आहेत. माधुरी मडावी आरमोरी (जि. गडचिरोली) येथून काँग्रेसतर्फे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.
लोकसभा असो वा विधानसभा निवडणुका, एकच उमेदवार वारंवार रिंगणात उतरत असल्याचे चित्र सर्वत्र आढळते. यामुळे नवीन चेहरे राजकारणात सक्रिय होऊ इच्छित नाहीत. संधीच मिळत नसेल तर राजकारणात शिरायचे कशाला असा त्यांचा प्रश्न असतो. अनेक वर्षे लोकांसाठी रस्त्यावर येऊन संघर्ष करणारे सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्तेही निवडणूक राजकारणापासून स्वत:ला दूर ठेवत आले आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकारणातील सक्रिय सहभागावर मर्यादा आल्या. काही राजकीय पक्षांनी त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला, पण राजकारणामुळे कालांतराने ते पुन्हा दूर गेले. या पाश्र्वभूमीवर गेल्या काही वर्षांत सामाजिक क्षेत्रात काम करणारी तरुण पिढी हळूहळू पुन्हा निवडणूक राजकारणात सक्रिय होऊ लागल्याचे चित्र विदर्भातील काही मतदारसंघात पाहायला मिळत आहे. यासंदर्भात वरील तीन नावे प्रामुख्याने दखलपात्र ठरतात.
पारोमिता गोस्वामी : पारोमिता गोस्वामी अनेक वर्षांपासून श्रमिक एल्गार संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. चंद्रपूरमध्ये दारूबंदी करावी यासाठी त्यांनी केलेले आंदोलन गाजले होते. सरकारने नंतर येथे दारूबंदी जाहीर केली. याशिवाय विविध प्रश्नांवर त्यांनी आंदोलने केली. त्यांची आतापर्यंतची वाटचाल संघर्षमय आहे. त्यांनी यावेळी आम आदमी पक्षातर्फे बह्मपुरीमधून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. काँग्रेसचे नेते आणि विद्यमान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे आमदार असून गोस्वामी यांची त्यांच्यासोबत लढत होणार आहे.
अॅड. लानसू नकोटी :
अॅड. नकोटी हे गडचिरोली जिल्ह्य़ातील आदिवासींसाठी लढणारे तरुण नेतृत्व आहे. ते सध्या गडचिरोली जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. ही निवडणूक लढवण्यासाठी लोकांनी त्यांना लोकवर्गणीतून निधी गोळा करून दिला होता. ते भामरागडमधून निवडणूक लढणार आहेत. त्यांना ग्रामसभेचा पाठिंबा आहे. वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी दिली आहे.
माधुरी मडावी : माधुरी मडावी या तरुण अधिकारी आहेत. प्रशासनात विविध पदांवर काम करताना त्यांनी राजकीय हस्ताक्षेपाच्या विरोधात बंड केले होते. त्यामुळे अनेक वेळा त्या वादग्रस्तही ठरल्या होत्या. त्या नागपूर जिल्ह्य़ातील नरखेड नगर पालिकेच्या मुख्याधिकारी असतानाही त्यांनी अतिक्रमण हटवण्याचा घेतलेला निर्णय गाजला होता. लोक त्यांच्या बाजूने व राजकीय नेते त्यांच्या विरोधात असे चित्र होते. त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र अद्याप तो स्वीकारण्यात आला नाही.