बुलढाणा: चिखली तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यासाठी आजची सकाळ धक्कादायक घटना घेऊन आल्याने आजचा दिवस हादरविणारा ठरला. चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे गावातील एका निर्घृण घटनेने चिखली परिसरात खळबळ उडाली असून समाजमन सुन्न झाल्याचे चित्र आहे.
कधीकाळी आदर्श गाव म्हणून ख्याती असलेल्या सावरगाव (डुकरे) येथे व्यसनांधीन मुलाने आपल्या जन्मदात्या माता पित्याची क्रूरपणे हत्या केली. यानंतर उपरती झाली म्हणून की काय या पुत्राने स्वतः देखील आत्महत्या केली.
सावरगाव डुकरे (तालुका चिखली) या शांत गावात पाच नोव्हेंबरच्या मध्यरात्री एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना घडली. दारूच्या नशेत मुलानेच आपल्या गाढ झोपलेल्या आई-वडिलांच्या डोक्यात आणि मानेवर कुऱ्हाडीने वार केले. त्यामुळे दोघांचा जागीच करुण अंत झाला. त्यानंतर स्वतः फाशी घेऊन निःस्वार्थ मायेच्या नात्याला कलंक लावणाऱ्या आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले आहे.
सुभाष दिगंबर डुकरे (वय ६० वर्ष), लता सुभाष डुकरे (वय ५५ वर्ष), विशाल सुभाष डुकरे (वय ३५ वर्ष) अशी तीन मृतांची नावे आहे. तिघेही एकाच कुटुंबातील असून एकाच दिवशी तिघांचा निर्घृण अंत झाल्याने व एकाच घरातील तिघांचे मृतदेह पाहून सावरगाव मधील ग्रामस्थ हादरले असून गावात एकच आकांत उसळला.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विशाल डुकरे हा काही दिवसांपासून दारूच्या आहारी गेला होता. काल रात्री तो मद्यधुंद अवस्थेत घरी परतला. घरात झोपलेल्या आई-वडिलांच्या डोक्यात आणि मानेवर त्याने कुऱ्हाडीने वार करून दोघांना जागीच ठार केले. नंतर अपराधीपणातून किंवा नशेत असताना त्याने घरातच फाशी घेऊन जीवन संपवलं.
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आला असून फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या पथकानेही तपास सुरू केला आहे. घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, दारूच्या व्यसनामुळे मानसिक असंतुलन निर्माण होऊन हा प्रकार घडल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या घटनेमुळे सावरगाव डुकरे गावात शोककळा पसरली असून, एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह पाहून नागरिकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
हत्या , आत्महत्या घटनेचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. चिखली पोलीस पुढील तपास करीत आहे …घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस यंत्रणा आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून पंचनामा सुरू आहे. तिन्ही मृतदेहांना पोस्टमार्टमसाठी जिल्हा उपरुग्णालय, चिखली येथे हलविण्यात आले आहे.
